दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत, नितेश राणेंची होणार चौकशी, मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
Nitesh Rane : 8 जून 2020 रोजी 28 वर्षीय दिशा सालियन (Disha Salian) हिचा मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली पडून मुत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होते. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून धक्कादायक आरोप करण्यात आले होते.
नितेश राणे यांनी दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला होता. मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांची मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चौकशी होणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि दिशा सालियन यांच्या हत्येप्रकरणातील पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला होता. त्यामुळे आता नितेश राणे यांची मुंबई पोलीसकडून चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी या चौकशीसाठी नितेश राणे यांना चौकशीसाठी नोटीस देखील बजावली आहे.
प्रकरण काय
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या दिशा सालियान व्यवस्थापक होत्या. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन 8 जून 2020 रोजी खाली पडून दिशा सालियन हीचा मुत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाने मुत्यूपूर्वी लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता आणि तिच्याशी बोलताना कामाचा लोड जास्त असल्याने ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर थोड्याच वेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या रूममध्ये होती त्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रत्यन केला होता मात्र दिशा रूममध्ये नव्हती. तेव्हा त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा खाली पडलेली दिसली. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) देखील करत होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी दिशाच मुत्यू झाला तेव्हा दिशा नशेत होती आणि तिचा तोल गेल्याने ती खाली पडली.
श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई
मात्र दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळात अनेक आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे चौकशीत कोणता नवीन खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.