“हिंमत असेल तर राजीनामा घेऊनच दाखव”, रामदास कदमांचं परबांना चॅलेंज; डान्सबारवरून जुंपली

Ramdas Kadam Challenges Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहेत. या वादाचं मूळ डान्सबारशी संबंधित आहे. मुंबईतील सावली डान्सबार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर कदम यांनी उत्तर दिलं होतं. परंतु, आज आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत डान्सबार योगेश कदम यांच्या मातोश्रींचाच असल्याचा दावा केला. लाज कशी वाटत नाही? असा सवालही त्यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्यावर आता माजी मंत्री आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंमत असेल तर राजीनामा घेऊनच दाखव असे आव्हान त्यांनी परब यांना दिलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच अनिल परब यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याचा इशारा त्यांनी दिला. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये. मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. मी आता राज्यातले सगळेच डान्सबार बंद करण्यासाठी मोहीम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे असे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.
‘सावली’ डान्सबार, पोलिसांची कारवाई अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर अनिल परबांचा खळबळजनक आरोप
अनिल परब अर्धवट वकील
यानंतर रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली. अनिल परब हा अर्धवट वकील आहे. विधीमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे. प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन मगच आरोप करावे लागतात. नियमबाह्य कामे करून आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्यावर उद्या हक्कभंग होणार आहे.
उद्धव ठाकरेंना कधीच शक्य होणार नाही
वकीलीची परीक्षा ह्याने कशी पास केली मला माहिती नाही. तू सभागृहात जो सातबारा उतारा दाखवला तो पाहायला अनिल परब यांनी त्यांच्या सगळ्या पिढ्या आणाव्यात. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असे म्हणत पुरावे सादर करण्याचे आव्हान माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिले. पोलिसांचे काय नियम आहेत ते पोलिसांना माहिती आहेत त्यांनी त्यांच्याकडून योग्य कारवाई केली. डान्सबार सुरू करून आम्ही कधी लोकांचे संसार उद्धवस्त केलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी कदम कुटुंबाला संपवण्याचा विडा उचलला आहे. पण ते कदापिही शक्य होणार नाही असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे… रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट