‘एसटी’ने पीएफ अन् ग्रॅच्युटीचे 2300 कोटी भरलेच नाहीत; एसटी कर्मचारी काँग्रेसचा खळबळजनक दावा

Mumbai News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC) जवळपास 87 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1 हजार 240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नाही. त्यामुळे गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली आहे, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी अंदाजे १२४० कोटी रुपये व ग्रॅच्युटीची अंदाजे 1 हजार 105 कोटी रुपये असे एकूण 2 हजार 345 कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारीपासून एसटी महामंडळाने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पीएफची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते. ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते. त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सदरची रक्कम 8.25 टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. पण गेले अनेक महिने एसटीने सदरची रक्कम गुंतवणूक केली नसल्याने त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले आहे.
संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकारकडून एसटीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडले असून ईपीएफओ कार्यालयाने काही नियम व अटी घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. ईपीएफओने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी भीती बरगे यांनी व्यक्त केली आहे.
वर्षानुवर्षे पीएफव ग्रॅच्युटी या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चागल्या प्रकारे चालल्या असून ईपीएफओ ऑफिस सुद्धा एसटीची ट्रस्ट ही सर्वात चांगली ट्रस्ट असल्याचे सांगत आहे. पण शासनाच्या उदासीनतेमुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आलेल्या आहेत. सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. आता यापुढे तेच एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबप्रमुख झाले असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदरची रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महत्वाच्या सूचना