हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

  • Written By: Published:
हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

नवी दिल्ली : आगामी काळात दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असून, हीच नफा कमावण्याची नामी संधी आहे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने वरील सल्ला दिला आहे. तसेच येत्या दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत व्यापाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्या ही मागणी मनसेकडून गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या मविआ सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

हीच व्यावसायात उलाढाल वाढवण्याची संधी

मराठी पाट्या लावल्याने दुकानदारांचाच फायदा आहे असे सांगत न्यायालयाने दसरा-दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ असल्याचा सल्ला व्यापाऱ्यांना दिला आहे. मराठी पाट्या लावल्याने दुकानदारांचाच फायदा होईल, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे. काही अटींनुसार, प्रत्येक छोट्या, मोठ्या दुकानावर मराठी पाट्या असणे गरजेचे आहे, असेही कोर्टाने खडसावले आहे.

कोर्टातील लढाईएवजी पाट्यांवर खर्च करा

दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याच्या आदेशासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांची कानउघडणी केली. यावेळी न्यायालयाने कर्नाटकातही नियम असल्याचे सांगत तुम्हाला नियम पाळायलाच हवे. तुम्ही महाराष्ट्रात आहात. तुम्हाला मराठी पाट्यांचा फायदा माहित नाही का? असा प्रश्न उपस्थित करत या विषयावर न्यायालयीन लढाईवर खर्च करण्याऐवजी साध्या मराठी पाट्यांवर पैसे खर्च करा असेही न्यायालयाने व्यापाऱ्यांना सांगितले.

‘हे’ सेव्हन स्टार मोदींनी पुन्हा मध्य प्रदेश मिळवून देणार? सात खासदारांना तिकीट देण्यामागे आहे खास ‘लॉजिक’

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज ठाकरेंचे ट्विट

मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायायलाच्या आजच्या आदेशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत आभार मानले आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.

असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे.

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत असे राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube