संजय राऊतांना धक्का! कोविड घोटाळ्यात पाटकर अन् भागीदारांची 12 कोटींची संपत्ती जप्त
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील कोविड 19 जंबो सेंटर (Mumbai News) घोटाळ्यात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणखी अडचणीत आले आहेत. ईडीने या घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि त्यांच्या भागीदारांची 12 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करत ईडी म्युच्युअल फंड युनिट्स, बँक खाती आणि तीन फ्लॅट अशी एकूण 12.2 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार आहे. या तीन फ्लॅट्सपैकी एक फ्लॅट हा सुजित पाटकरच्या नावावर असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी निविदा मिळून 31.84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कोविड सेंटर घोटाळा; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना 5 दिवसांची पोलिस कोठडी
कोण आहेत सुजित पाटकर?
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर कोविड घोटाळा प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. त्यानंतर ईडीकडून मुंबईत एकूण 15 जागेंवर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी सुजित पाटकरांच्या घरी ईडीला अलिबागच्या जमिनीच्या व्यवहारांची कागदोपत्रे मिळाली होती. या व्यवहारात सुजित पाटकरांच्या पत्नीसह वर्षा राऊत यांचंही नाव असल्याचं समोर आलं होतं. संजय राऊतांनी पाटकर माझे मित्र असल्याचं म्हटलं होतं.
किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर ईडीने सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे मुंबई महापालिकेचे डॉक्टर असून ते दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणात ईडीने पुढील कारवाई केली आहे. सुजित पाटकर आणि त्यांच्या साथीदारांची संपत्ती जप्त होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणात आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.