‘मित्रपक्षांसाठी हक्काच्या जागा सोडू नका’; शिंदेंच्या मंत्री अन् आमदारांचा नाराजीचा सूर
Eknath Shinde : राज्यातील काही मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू आहे. जागावाटपात भाजपकडून विनाकारण दबाव टाकला जात आहे असा मेसेज घटकपक्षांत गेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या जागा टिकवून ठेवणे अवघड होत आहे. या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसला आहे. चार खासदारांची तिकीटे कापण्यात आली. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता अन् नाराजी आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागा मित्रपक्षांसाठी सोडू नका, अशी मागणी अनेक आमदारांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
मी आता आणि भविष्यातही पवारांसोबतच; वडिलांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर रोहिणी खडसेंचे स्पष्टीकरण
निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांचे पुनर्वसन करा अशीही मागणी या बैठकी करण्यात आली. महायुतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. बहुतांश जागांवर वाद मिटल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. नाशिक, ठाणे यांसारख्या काही जागांवर मात्र तिढा वाढला आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे सांगण्यात येत आहे.
जागावाटपात मात्र भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटात काहीशी नाराजी निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचाच प्रत्यय कालच्या मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत आला. राज्यात आपल्या ज्या हक्काच्या जागा आहेत त्या कोणत्याही परिस्थितीत सोडू नका अशी मागणी आमदार आणि मंत्र्यांनी केली. तसेच या निवडणुकीत ज्यांना तिकीट देता येणे शक्य होणार नाही त्यांचे काहीतरी राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
शिर्डी-ठाण्यात एकनाथ शिंदेंचा धक्का; संभाव्य उमेदवारांची यादी तयार
ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, नाशिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा आजिबात सोडू नका अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. याआधी परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. रायगड, शिरुर हे हक्काचे मतदारसंघ आपले असतानाही मित्रपक्षांना देऊन शांत राहिलो. प्रचार सुरू केला. आता मात्र ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर आजिबात सोडू नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.