वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी पाटील पुन्हा मंचावर; पहिल्यांदाच मुंबईत कार्यक्रम

वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी पाटील पुन्हा मंचावर; पहिल्यांदाच मुंबईत कार्यक्रम

मुंबई : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami patil) हिचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी नृत्यासाठी पुन्हा मंचावर उपस्थित राहिली आहे. याशिवाय दहीहंडीच्या निमित्ताने तिने यावेळी पहिल्यांदाच मुंबईतही कार्यक्रम केला. गौतमी पाटीलने आमदार प्रकाश सुर्वे आणि देवीपाडा येथील तारामती चॅरिटेबल ट्रस्चच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवासाठी हजेरी लावली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली, खूप छान वाटतं आहे. मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटत आहे. कार्यक्रमानिमित्त मी बऱ्याच ठिकाणी जाते. सगळीकडे जसा प्रतिसाद असतो, तसाच इथेही प्रतिसाद मिळाला. लोकांचं प्रेम बघून छान वाटलं. यावेळी तिने मुंबईत सुरक्षित वाटलं, मुंबईकरांचं आजचं प्रेम बघून मी भारावून गेली आहे, असं म्हणतं मुंबईचे कौतुकही केले. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्यासोबतच करिश्मा कपूर, बिपाशा बसूही उपस्थित होत्या. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेवासर अवस्थेत आढळले होते वडील :

गौतमी पाटीलचे वडील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळून आले होते. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन त्यांचे नाव उघडकीस आले होते. त्यावरुन ही व्यक्ती गौतमी पाटील हिचे वडील असल्याचे पुढे समोर आले. गौतमी पाटील हिने वडिलांची काही विचारपूस केली नाही किंवा साधा संपर्कही साधला नाही, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर गौतमी पाटील हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात माझे वडील हे गंभीर अवस्थेत आढळले. त्याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. ते बेवारस स्थितीत आढळल्याच्या बातम्यांमधून मला कळाले. त्यानंतर गौतमीने तिच्या मावशीला सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. त्यानंतर धुळ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रवींद्र पाटील यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.

वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. त्यांच्यावर पुढील उपचार मी पुण्यालाच करणार असेही गौतमीने सांगितले होते. रवींद्र पाटील यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube