चोरी, हत्या की आणखी काही? पोलिसांनी हल्लेखोराचा प्लॅन केला डिकोड!
Saif Ali khan Stabing Case : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला (Saif Ali Khan) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचं थेट बांग्लादेश कनेक्शन समोर येत आहे. नाव बदलून तो येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (वय 30) असे त्याचे नाव असल्याची माहिती डिसीपी दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आरोपी नेमका कोणत्या हेतूने घरात घुसला होता याची उलगडा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसला होता. त्याला माहिती नव्हतं की हे घर सैफ अली खानचं आहे. मुंबई पोलिसांच्या 30 पेक्षा जास्त टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. पोलिसांच्या या प्रयत्नांना 72 तासांनंतर यश मिळालं. पोलिसांनी या आरोपीला ठाण्यातून अटक केली. आता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तसेच पोलीस सैफ अली खानचाही जबाब नोंदवून घेणार आहेत.
सैफवर हल्ला करणारा बांग्लादेशी? घरात कसा घुसला? कुणी मदत केली; पोलिसांनी सगळचं सांगितलं..
मायदेशी जाण्याचा प्लॅन, पण पकडलाच
पोलीस आपला शोध घेत आहेत याची कुणकुण आरोपीलाही लागली होती. न्यूज चॅनेल्स पाहून त्याला या घडामोडींची माहिती मिळत होती. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना गुंगारा द्यायचा अन् थेट बांग्लादेश गाठायचा असा त्याचा प्लॅन होता. पोलिसांना ओळख पटू नये यासाठी आरोपी सारखा कपडे बदलत होता. पोलीस सातत्याने त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये त्याचे शेवटचे लोकेशन सापडले. पोलिसांनीही वेळ न दवडता कोबिंग ऑपरेशन सुरू केलं.
पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी आरोपीने अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं. तरी देखील पोलिसांच्या नजरेतून काही तो सुटला नाही. पोलिसांनी येथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला चोप देत येथून घेऊन गेले असे या वसाहतीतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा सगळा थरार घडला.
सीसीटीव्ही दिसताच चेहरा झाकायचा, फोनही बंद
घटनेनंतर आरोपीने त्याचा मोबाइल स्वीच ऑफ केला होता. यानंतर काही वेळाने त्याने फोन ऑन केला आणि एक कॉल केला. बोलणं झाल्यानंतर पुन्हा त्याने फोन बंद केला. मार्केट किंवा रस्त्यावर वावरताना जिथे कुठे सीसीटीव्ही दिसेल तिथे आरोपी चेहरा झाकून घेत होता. पण पोलिसांनी त्याचा फोन ट्रेस केलाच. जिथे जिथे आरोपी हजर होता तेथील अॅक्टिव्ह मोबाइल नंबरचे आकडे पोलिसांनी जुळवले. आरोपी आधी मुंबईतील एका पबमध्ये काम करत होता. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील तो रहिवासी असल्याचे आधी सांगितले होते. परंतु, ही माहिती खरी नव्हती. हा आरोपी मूळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचे पोलिसांनी आता सिद्ध केलं आहे.
आरोपी पक्का बांग्लादेशी, पुरावेच मिळाले
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवी उत्तरं देत होता. ओळख उघड करत नव्हता. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्याने दिलेल्या माहितीतून पोलिसही चक्रावून गेले. बांग्लादेशात जाण्यासाठी मधल्या काळात आरोपीने अनेकांशी संपर्क साधला होता. त्याच्याकडून त्याचा बांग्लादेशी जन्म दाखला पोलिसांनी हस्तगत केला. बांग्लादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील नाल शहरातील तो रहिवासी आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच तो भारतात आला होता. विजय दास असं खोटं नाव धारण करुन येथील एका हाऊस किपिंग कंपनीत तो काम करत असल्याचेही पोलीस तपासात समोर आलं.
मोठी बातमी! सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; ठाण्यातून उचलले