अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी, शिक्षण विभागाची माहिती
मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत दादादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवारी) मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरमधील शाळांना गुरुवारी सुट्टी (School holidays) जाहीर केली आहे. ( schools in Mumbai and Konkan closed tomorrow due to heavy rain Education Department decision)
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शिवाय, येत्या २४ तासात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
कोकण विभागात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोकण विभागातील जिल्ह्यांमधील शाळांना २० जुलैला सुट्टी देण्यात आली आहे.
–#kokan #kokandivision #mumbai #schools #heavyrain #raigad #ratnagiri #sindhudurga #Palghar #thanekar #LetsUppMarathi #maharashtra pic.twitter.com/bHghfewg36— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 19, 2023
या परिपत्रकानुसार, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रीतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
शासन आदेश-
ज्याअर्थी, कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडुन पूरस्थिीती निमार्ण झाली आहे. तसेच येणा-या तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याअर्थी, मुख्यमंत्र्यांनी कोकणातील दि. २० जुलै, २०२३ रोजी अनुक्रमे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये याची कल्पना होईल व त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.
मुख्यमंत्री शिंदेचे आवाहन
राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.