CM शिंदेंशी चर्चा, वाघ नरमले! पण कीर्तिकर-कदम वाद काय होता? वाचा ‘उत्तर-पश्चिम’ची A टू Z स्टोरी
मुंबई : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) खासदार आहेत, त्यामुळेच तिथून पुढची निवडणूक तेच लढविणार आहेत. ते निवडणूक लढविणार असतील मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. या लोकसभा मतदारसंघावरुन खासदार कीर्तिकर यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रामदास कदम माध्यमांशी बोलत होते.
पण काय होता संपूर्ण वाद?
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले होते. गजानन कीर्तिकर यांचे वय झाल्याने ते तिथून निवडणूक लढविणार नाहीत, असे म्हणत कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यास कीर्तिकरांनी विरोध केला होता. या जागेवरुन आपणच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो मी खेचून आणला. 2014 ला पावणे दोन लाख तर 2019 ला पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात मी कामं केली आहेत, करोडो रुपयांचा फंड वापरलाय, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे, आजही लोकांमध्ये वावरत आहे. त्यामुळे इतर कुणीही या मतदारसंघावर दावा सांगू शकत नाही, असे प्रत्युत्तर किर्तीकर यांनी दिले होते.
मात्र इथेच रामदास कदम यांना राजकारणाचा वास आला. गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. त्यांना पक्षाने उत्तर-पश्चिम मतदारसंघातून यापूर्वीच उमेदवारीची घोषणा केली आहे. यामुळे कीर्तिकर आपल्या मुलासाठी मतदारसंघ सुरक्षित करत आहेत, असा संशय कदमांना आला आणि यानंतर वादाची खरी ठिणगी पडली. यानंतर रामदास कदमांनी मनातील गोष्ट थेट बोलून दाखविली.
कीर्तिकर पाठीत खंजीर खूपसू नका :
त्यावर रामदास कदम यांनी खासदार कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. गजानन कीर्तिकरांनी स्वतः उभे राहावे, पण तुमचा मुलगा तिकडे, तुम्ही मुलासाठी फॉर्म भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही एवढे पथ्य पाळा. बाकी तुम्हाला विरोध करण्याचे कारण नाही. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. फक्त एका ऑफिसमध्ये बाप बेटा बसतात, तुमचा फंडही तोच वापरतो. काय करतात हे जनता पाहत आहे. मुलगा तिथून उभा राहणार, तुम्ही इथून फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून द्यायचे, असे कटकारस्थान होता कामा नये, असे कदम म्हणाले होते.
कीर्तिकरांकडून पत्रक काढून कदमांचे जाहीर वाभाडे :
यावर बोलताना किर्तीकर यांनी एक पत्रक काढून कदम यांच्यावर आरोप केले होते. रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे. 1990 साली मी जेव्हा मालाडमधून विधानसभा निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. त्यांनी मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत. खेड ते पुणे असा त्यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसून प्रवास केला. राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा केली होती, असेही त्यांनी म्हटले होते.
गद्दारीच्या आरोपांनंतर कदम चवताळले :
कीर्तिकर भ्रमिष्ट झालेत :
कीर्तिकरांनी जाहीररित्या वाभाडे काढल्यानंतर रामदास कदम चांगलेच चवताळले. त्यांनी एकापाठोपाठ एक आरोपांची आणि टीकेची मालिकाच सुरु केली. किर्तीकरांचे 80 ते 85 वर्षे वय झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, 1990 मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून तिकीट दिले.
केशव भोसले यांच्याबरोबर माझ्याविरोधात दाऊद होता. दाऊदविरोधात निवडणूक लढून मी निवडून आलो. मी खेडमध्ये उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो? असा सवाल करत याउलट कांदिवलीत शाखाप्रमुख होतो आणि मी केलेल्या कामांवरती किर्तीकर निवडून आले, म्हणजे गजानन किर्तीकर बेईमान आहेत. त्यांना हे शोभत नाही. माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढत आहेत.
उद्धव ठाकरेंना सांगून गितेंचे काम थांबवले :
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून 2009 साली अनंत गिते यांनी माझा पराभव केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला अनंत गिते यांचे काम करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे गद्दारीची औलाद आमची नाही, ती गजानन किर्तीकरांची असेल. नारायण राणे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याविरोधात मी एकटा लढत होतो. तेव्हा किर्तीकर घरी बसले होते आणि आता गद्दार कोणाला बोलत आहात? असा सवालही त्यांनी केला होता. तसेच मुलाला निवडून आणण्यासाठी कीर्तिकर पक्षाशी गद्दारी करत आहेत, असाही आरोप कदम यांनी केला होता.
थेट खासगी आयुष्यावरतीच घाला :
यानंतर रामदास कदम यांनी थेट कीर्तिकरांच्या खाजगी आयुष्यावरच घाला घातला. गजाभाऊ तुम्हाला माझ्याविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला तुम्ही पुण्याला जाता. हे सगळं बोलू का? महाराष्ट्राला सांगू का? मला हे बोलायला लावू नका. ज्येष्ठ नेते म्हणून कालपर्यंत तुमची इज्जत ठेवली. पण मला बोलायला लावू नका. महिलाही तुम्हाला मत देणार नाहीत. तुम्हाला चपलीने मारतील. तुमची अडचण होईल, तुमचं वस्त्रहरण करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला.
सुधीर जोशींशी गद्दारी :
गजाभाऊ तुम्ही मला गद्दारीचा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण लोकाधिकार समितीच्या माध्यमातून तुम्ही सुधीर भाऊच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुम्ही गद्दार केली. हे मला बोलायचं नव्हतं पण गद्दार तुम्ही आहात, गद्दारी तुमच्या नस-नसात आहे. तुमचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुमचं पित्त खवळलं. त्यानंतर इतर नेत्यांना गद्दार म्हणत आहात. महाराष्ट्र तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गजाभाऊ तुमचं राजकारण मला चांगलं माहिती आहे. मी तुमच्या मुळावर उठलो, तुम्ही खरे काय आहे, हे सांगायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर दोन्ही वाघ ‘नरमले’
या वादाच्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज रामदास कदम यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली. आज दुपारी रामदास कदम यांनी खासगी आयुष्यावर केलेल्या आरोपांना कीर्तिकरांनी प्रत्युत्तर देणे टाळले. त्यानंतर कदम यांनीही तलवार म्यान केली. माझी बाजू मी मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. भविष्यात असे वाद टाळायचे असून काही अडचण असल्यास एकनाथ शिंदेंसोबतच चर्चा करायची ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातून गजाभाऊ खासदार आहेत, तेच पुढची निवडणूक लढवतील, असे सांगितले. त्यामुळे तुर्तास वाद मिटला असला तरी भविष्यात शिंदे यांच्यासाठी निवडणुका अन् उमेदवारी हे विषय जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.