आवाज उठवण्याची वेळ आली आहे… केंद्र सरकारला धारेवर धरत अभिजीत दिपके यांची आंदोलनाची घोषणा
दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.
Abhijeet Deepke’s protest announcement : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. विविध परीक्षा प्रक्रियांमधील गोंधळ, गैरव्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांमुळे सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे अभिजित दिपके यांनी देशभरातील विद्यार्थी, युवक आणि समर्थकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आणि लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिपके यांनी आपल्या संदेशात सांगितले की, देशातील लाखो विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेतील वारंवार होणाऱ्या चुका, पेपरफुटीच्या घटना आणि निकाल प्रक्रियेतील त्रुटींमुळे मानसिक तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा.
राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेसाठी विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा, टिंगरेही अर्ज दाखल करणार
यासाठी ते येत्या 6 जून रोजी सकाळी दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या समर्थकांना त्यांनी विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. विमानतळावरून सर्वजण एकत्रितपणे संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाणार असून, जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी अधिकृत परवानगी मागितली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवला, तर सरकारला विद्यार्थ्यांच्या भावना ऐकाव्याच लागतील. हा कोणत्याही पक्षविरोधातील संघर्ष नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठीचा लढा आहे, असे देखील दिपके यांनी म्हटले आहे. दरम्यान, अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टी या युवा-केंद्रित सोशल मीडिया चळवळीने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चळवळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे.
6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाकडे आता देशभरातील विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.