Selling Scrap : रद्दी, भंगार विकून केंद्र सरकार मालामाल, कमावले 600 कोटी
Selling Scrap : केंद्र सरकारने आपल्या सर्व कार्यालयांमधील जुन्या फाईल्स, जुन्या वस्तू, पेपर, रद्दी, जुनी वाहनं विकून तब्बल 600 कोटी रुपये कमावले आहेत. ऑगस्टपासून अर्थात अवघ्या दीड महिन्यामध्येच केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कमाई 1 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत भंगारातून जेवढी रक्कम कमावली आहे, तेवढीच रक्कम चाद्रयान-3 वर खर्च करण्यात आली आहे.
केंद्र सरकार आगामी काळात 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष अभियान 3.0 सुरु करणार आहे. त्यामध्ये स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा या विशेष मोहीमेतून प्रयत्न असणार आहे.
मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच अशा प्रकारच्या मोहिमेतून 371 कोटी रुपयांची कमाई सरकारने केली होती. यंदा तिसऱ्या टप्प्यातील महसूलाचं लक्ष्य 400 कोटी रुपयांचं आहे. तर 2021 मध्ये या कार्यक्रमातून 62 कोटी रुपयांची कमाई केली होती. सरकारला स्वच्छता मोहिमेतून दर महिन्याला 20 कोटी रुपयांची कमाई करण्याचं टार्गेट आहे.
यामुळे सरकारी कार्यालयातील रद्दी, जुन्या फाईल्स, खराब झालेली कपाटं मोकळी करण्यात आली. त्याचबरोबर निकामी वाहनांचा देखील लिलाव करण्यात आला. त्यामुळे कार्यालयांमधील मोठ्या प्रमाणात जागा मोकळी होण्यास चांगली मदत झाली.
दोन वर्षांपूर्वी मोहीम सुरु केल्यानंतर आत्तापर्यंत सुमारे 31 लाख सरकारी फाईल्स हटवल्या आहेत. आत्तापर्यंत सरकारी कार्यालयांमधील 185 लाख स्क्वेअर फूट जागा मोकळी झाली आहे. गेल्या वर्षी अशाच मोहिमेतून 90 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली होती. पुढच्या अर्थात ऑक्टोबर महिन्यात 10 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्याचं लक्ष्य आहे.