सत्ताधारी-विरोधकांच्या कुस्तीपासून 8 पक्ष लांब! ‘एकला चलो रे’ भूमिका कोणाला ठरणार डोकेदुखी?
मुंबई : देशाचे राजकारण काल (18 जुलै) दोन शहरांमध्ये एकवटले होते. भाजपच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काल दिल्लीत बैठक पार पडली. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील आधीच्या युपीएची आणि आताच्या INDIA ची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. दोन्ही बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांच्या या राजकीय कुस्तीमध्ये सहभागी न होण्याची काही पक्षांनी भूमिका घेतली आहे. यात प्रमुख 8 पक्षांची नाव समोर येत आहेत. (8 parties had refrained from participating in meetings of ruling NDA and opposition INDIA)
कोणते पक्ष होते तटस्थ?
- बिजू जनता दल (नवीन पटनायक)
- भारत राष्ट्र समिती (के. चंद्रशेखर राव)
- बहुजन समाजवादी पक्ष (मायावती)
- वायएसआर काँग्रेस (वायएस जगन मोहन रेड्डी)
- शिरोमणी अकाली दल (सुखबीर सिंग बादल)
- जेडीएस (एचडी कुमारस्वामी)
- मनसे (राज ठाकरे)
- एमआयएम (असदुद्दीन ओवैसी)
तटस्थतेमुळे काय होईल चित्र?
या 8 पक्षांनी सत्ताधारी NDA किंवा विरोधातील INDIA अशा कोणत्याही गटाच्या बैठकीत सहभागी होणे टाळले होते. यातील ओडिसा राज्य बिजू जनता दलाचा बालेकिल्ला आहे. मागील 24 वर्षांपासून बिजू जनता दलाची सत्ता असून नवीन पटनायक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे अद्यापही भाजप आणि काँग्रेसला या राज्यातील सत्तेसाठी बरेच प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे.
आशीर्वाद नाही तर, दिल्ली भेटीचे निमंत्रण; PM मोदींचा निरोप घेऊन अजितदादा गेले होते पवारांच्या भेटीला
अन्य ठिकाणी सत्तेसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यात आता तेलंगणामध्ये काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि भाजप असे तिन्ही पक्ष आमने-सामने येणार आहेत. या तिघांना एमआयएमचेही तगडं आव्हान असणार आहे. जेडीएस तटस्थ राहिल्याने याचा परिणाम कर्नाटकमध्ये पाहायाल मिळणार आहे. काँग्रेस. जेडीएस आणि भाजप असे तीन पक्ष एकमेकांना आव्हान देताना दिसणार आहेत.
तर उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाजवादी पक्ष, समजावादी पक्ष आणि भाजपमध्ये सत्ता संघर्षासाठी लढाई होण्याचे चित्र आहे. आंध्रप्रदेशमध्ये सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस तटस्थ राहिल्याने इथे आगामी निवडणुकीत वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, विरुद्ध तेलगु देसम पक्षाची लढाई पाहायला मिळणार आहे. तेलगु देसम पक्षाची भाजपसोबत आघाडी आहे. त्यामुळे तिरंगी लढाई होण्याची शक्यता आहे.
मायावती स्वबळावर निवडणुका लढविणार?
लोकसभा निवडणुकीसंदर्भात बसपा प्रमुख मायावती यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. बहुजन समाजवादी पक्ष 2024 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी त्यांनी विरोधी आघाडीवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाले की, विरोधी आघाडी सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना मायावती म्हणाल्या की, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी जातीवादी पक्षांशी युती करत आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू.
CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा
याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्ये आम्ही सहकारी पक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फारसा फरक नाही, असं म्हणतं त्यांनी भाजपचं कौतुकही केलं.