गुजरात-मध्य प्रदेशात एकाचवेळी छापे; दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 8 जणांना अटक
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
8 suspects linked to Jaish-e-Mohammed arrested : देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणारा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कट गुजरात एटीएसने उधळून लावला आहे. बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशावरील संभाव्य मोठे संकट टळल्याचे मानले जात आहे.
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने मोठी कारवाई करत गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत एकूण 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अहमद अब्दुल्ला गाजीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसैन घाघा, मुदस्सिर अब्दुल्ला गाजीवाला, जकारिया दुरानी मोहम्मद अम्मार घाघा, मुफ्ती फौजान इस्माइल दौवा, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल रहमान सावदी आणि बिलाल दुरानी मोहम्मद अम्मार घाघा यांचा समावेश आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, हे आरोपी पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होते. गुजरात आणि मध्य प्रदेशात संघटनेचे गुप्त जाळे उभारणे, नव्या सदस्यांची भरती करणे आणि दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करणे, अशा कारवायांमध्ये ते सक्रिय असल्याचा आरोप आहे. याच माध्यमातून भविष्यात मोठ्या घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
मेटाच्या मागे हात धुवून लागलं भारत सरकार, आता इंन्स्टावरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातीसाठी पाठवलं समन्स
या प्रकरणी आरोपींविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अर्थात युएपीए अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या सर्व आरोपींची सखोल चौकशी सुरू असून त्यांचे इतर दहशतवादी नेटवर्कशी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
जैश-ए-मोहम्मद ही संघटना भारताविरोधातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. 2000मध्ये मसूद अझहरने स्थापन केलेल्या या संघटनेचे नाव जम्मू-काश्मीर विधानसभा हल्ला, पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, उरी हल्ला आणि पुलवामा आत्मघाती हल्ल्यासारख्या घटनांशी जोडले गेले आहे. त्यामुळे या संघटनेच्या हालचालींवर भारतीय सुरक्षा यंत्रणांचे विशेष लक्ष असते.
गुजरात एटीएसच्या या कारवाईमुळे देशविघातक कारवायांचा एक मोठा कट वेळेत उधळून लावण्यात यश आल्याचे मानले जात आहे. मात्र या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा आता अधिक सखोल चौकशी करत आहेत. देशाच्या सुरक्षेविरोधातील कोणत्याही कारवायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देतानाच सुरक्षा यंत्रणांनी आपली सतर्कता कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.