मिशन 2024: ममता दिदींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी घेतली अखिलेश यादवांची भेट
Nitish Kumar met Akhilesh Yadav : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या एकजूटीसाठी (Opposition Unity) पुढाकार घेतला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली. ममतांच्या भेटीनंतर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली.
अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी अधिकाधिक विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याचे सरकार कोणतेही कल्याणकारी काम करत नसून ते केवळ प्रसिद्धीवर अवलंबून असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला.
विखेंना राऊत-पवारांचा प्रश्न विचारताच सुशीलकुमार शिंदेंचा काढता पाय
नितीश कुमार यांनी आज समाजवादी पक्षाच्या कार्यालयात सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी नितीश कुमार यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. त्याचबरोबर या भेटीदरम्यान अखिलेश यादव म्हणाले की, महागाई आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असून भाजप सरकारला तातडीने हटवण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि त्यांनी विरोधी पक्षांची युती करण्याची विनंती केली. दोन्ही नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र तयारी करण्याच्या गरजेवर भर दिला. ही बैठक सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित होते.