अनिल अंबानी आणखी गोत्यात! 3 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी लूकआउट नोटीस जारी

Anil Ambani News : तीन हजार कोटी रुपयांशी संबंधित कथित कर्ज घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने आज अनिल अंबानी यांच्याविरुद्ध लूकआउट सर्कुलर जारी करण्यात आले आहे. परिणामी आता अनिल अंबानी न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ शकत नाहीत. याआधी ईडीने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर छापे टाकले होते. फसवणुकीचे आरोप आणि एका केंद्रीय एजन्सीने समन जारी केले होते. त्यानंतर लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
अनिल अंबानींच्या कंपन्यांनी सरकारी योजनेंतर्गत सरकारी पैशांचा गैरवापर केला. तसेच बँकांना धोका दिल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सन 2017 ते 2019 दरम्यान येस बँकेकडून मिळालेल्या तीन हजार कोटींच्या कर्जाचे पैसे अन्य ठिकाणी पाठवण्यात आले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कर्ज मिळण्याआधी येस बँकेच्या प्रमोटरांशी संबंधित कंपन्यांना पैसे पाठवण्यात आले होते. यावरुन अधिकारी आणि कर्ज घेणाऱ्या कंपन्यांत काही संगनमत आहे का असा संशय निर्माण झाला.
मोठी बातमी! अनिल अंबानींविरुद्ध ED ची कारवाई; तब्बल 50 ठिकाणी टाकले छापे
ईडी आता अनिल अंबानींच्या कंपन्या आणि येस बँकेचे प्रमोटर यांच्यातील संबंधांचा तपास करत आहेत. कर्ज घेतेवेळी नियमांचे योग्य पद्धतीने पालन झालेले नाही अशी माहिती तपासातून समोर आली आहे. जुन्या तारखा टाकून अनेक कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. व्यवस्थित तपासणी न करताच गुंतवणूक करण्यात आली आणि बँकेच्या कर्ज धोरणाचेही उल्लंघन करण्यात आले.