‘इंडिया’चे जागावाटप तोंडावर अन् नितीश कुमारांची तिरकी चाल; भाजपसोबत जात पुन्हा पलटी मारणार?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आजच्या राजकीय खेळीने इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना टेन्शनमध्ये टाकले आहे. नितीश कुमार यांनी आज (सोमवार) पाटणा येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती सोहळ्याला हजेरी लावली. पण त्याचवेळी त्यांनी इंडियन नॅशनल लोक दलने कैथल येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने विरोधकांच्या गोटात नितीश कुमार पुन्हा भाजपच्या जवळ जात आहेत का? या चर्चांना उधाण आलं आहे. (Bihar chief minister Nitish Kumar on Monday attended Pandit Deendayal Upadhyay’s birth anniversary organised by the Bharatiya Janata Party)
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते होते. 25 सप्टेंबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपकडून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात नितीशकुमार यांच्या उपस्थितीमुळे एनडीएशी त्यांची जवळीक वाढली आहे का असा सवाल विचारला जात आहे. नितीश कुमार यांनी मात्र या चर्चांना फेटाळून लावल्या आहेत.
कौतुकास्पद! तमिळनाडूमध्ये अवयवदात्यांना हुत्माम्यांचा दर्जा; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
नितीश कुमार म्हणाले, “आम्ही सर्वांचा आदर करतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती राज्य कार्यक्रम म्हणून साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आम्ही सर्वांसाठी काम करत आहोत. भविष्यातही आम्ही अशीच विकासकामे करत राहू, तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत आहे. इतर काय बोलतात याच्याशी मला देणेघेणे नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन नॅशनल लोक दलने कैथल येथे इंडिया आघाडीच्या बहुतेक नेत्यांना आमंत्रित केले होते, यात नितीश कुमार, त्यांचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा समावेश होता.
Letsupp Special : शरद पवारांनी अदानी समुहाच्या ‘ज्या’ प्रकल्पाचे उद्घाटन केले तिथे काय तयार होणार?
नितीश कुमार यांच्या उपस्थितीबद्दल भाजपमध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. “दिवंगत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी तिथे भेट दिली हे स्वागतार्ह पाऊल आहे,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले. तर “नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आहेत”, असे राज्यसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती कार्यक्रमाला हजेरी लावणे हे त्यांच्या इंजिया आघाडीतील मित्र पक्षांवर दबाव टाकण्यासाठी खेळलेली एक सूक्ष्म चाल म्हणून पाहिले जाते आहे. जागा वाटपाची वेळ जवळ येत आहे, अशावेळी योग्य वाटा न दिल्यास मी भाजपचा विरोध करणार नाही, असा स्पष्ट संदेश नितीश कुमार देताना दिसत असल्याचे पाटणा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राजकीय विश्लेषक एन के चौधरी म्हणाले.