बिहारी राजकारणात नवा ट्विस्ट! भाजपने नितीश कुमारांचा विश्वासू शिलेदारच फोडला
Bihar Politics : देशातील विरोधी पक्षांची एकी करून भाजपला (BJP) टक्कर देण्याचा प्लॅन तयार करत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना आणखी एक धक्का बसला आहे. शोषित इंकलाब पार्टीने एनडीए बरोबर जाण्याची घोषणा केली आहे. पार्टीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नागमणि कुशवाहा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत या निर्णयाची माहिती दिली.
नागमणि म्हणाले, शोषित इंकलाब पार्टी लवकरच भाजप नेतृत्वातील एनडीएत सहभागी होणार आहे. राज्यात एनडीएला मजबूत करण्याचे काम आम्ही करणार आहोत. बिहारचे लोक आता नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या जोडीला वैतागले आहेत. बिहारी जनतेला केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार यावे असे वाटत आहे.
PM मोदींना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार! कोण आहे साकेत गोखले?
कोण आहेत नागमणि कुशवाहा
नागमणि कुशवाहा हे बिहारमधील क्रांतीकारी नेते दिवंगत जगदेव प्रसाद यांचे पुत्र आहेत. राज्यातील प्रमुख समाजवादी नेत्यांत त्यांचे नाव आघाडीवर होते. राज्यातील वंचित घटकांसाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. 1974 मध्ये ते अरवल जिल्ह्यातील कुर्था येथे आंदोलन करत होते. या आंदोलना दरम्यान गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचे समर्थक आणि पोलिसांत आरोप प्रत्यारोप सुरू होते. या घटनेमागील सत्य अजूनही बाहेर आलेले नाही. अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर नागमणी यांनी या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
नितीश कुमार यांची राज्यातील अतिमागास समाज कुर्मी आणि कोइरी समाजावर चांगली पकड आहे. याला लव कुश समीकरणही म्हटले जाते. बिहारमध्ये या समाजातील मतदारांची संख्या जवळपास 12 टक्के आहे. लोकसभा निवडणुकांआधी भाजप सातत्याने या व्होटबँकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता. उपेंद्र कुशवाहा आधीच एनडीएत सहभागी झाले आहेत. तसेच भाजपने कुशवाहा समाजातील सम्राट चौधरी यांना राज्यातील पार्टीची कमान दिली आहे. आता नागमणी कुशवाहा सुद्धा भाजपसोबत येत आल्याने भाजपाच्या ताकदीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नितीश कुमार यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.