‘खेल अभी बाकी है!’ नितीश कुमारांच्या ‘मित्रा’ला काँग्रेसची थेट CM पदाची ऑफर
Bihar Politics : बिहारमध्ये मोठ्या राजकीय (Bihar Politics) उलथापालथी होऊन नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीही झाले. मात्र अजून सरकारला विधानभवनात बहुमत सिद्ध करणे बाकी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही. यातच आता बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) चांगलेच चर्चेत आले आहेत. मांझी त्यांच्या पक्षासाठी दोन जागांची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस (Bihar Congress) पक्षाने जीतनराम मांझी यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
काँग्रसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांना ज्यावेळी विचारण्यात आले की मांझी एनडीए सरकारकडे दोन मंत्रिपदांची मागणी करत आहेत असे विचारले असता सिंह म्हणाले मांझी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना थेट मुख्यमंत्री बनवू. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात राजदचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनीही भाष्य केलं आहे. सगळ्या गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाहीत. तेजस्वी यादव यांनी (Tejaswi Yadav) स्पष्टपणे सांगितले आहे की खेल अभी बाकी है.
Bihar Politics : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे CM; भाजपाच्या तिघांनी घेतली शपथ
बिहारच्या नव्या सरकारमध्ये भाजपाकडून दोन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत. तसेच हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम) अध्यक्ष संतोष सुमन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अपक्ष आमदार सुमित सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेली नाही. त्याआधीच जीतनराम मांझी यांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणाने पुन्हा वेग घेतला आहे.
दरम्यान, मांझी स्वतः देखील बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या ते एनडीएबरोबर आहेत. तसेच मंत्रिमंडळातही त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. आता त्यांनी आणखी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्यांच्या पक्षाचे एकूण चार आमदार आहेत. अशा परिस्थितीत भाजप-जेडीयू सरकार त्यांची मागणी मान्य करणार का, जीतनराम मांझी काँग्रेस पक्षाने दिलेली ऑफर स्वीकारणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD
नितीश कुमारांनी लालू यादवांची साथ का सोडली ?
राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत ताणलेले संबंध, इंडिया आघाडीत होत असलेले दुर्लक्ष, जागा वाटपाला काँग्रेस घेत असलेला वेळ, इंडिया आघाडीचे शिल्पकार पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा नाही, अशा विविध कारणांनी नितीश कुमार नाराज झाल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते बिहारमध्ये दाखल झाले होते.