धक्कादायक! हत्तीच्या हल्ल्यात भाजप युवा नेते अनुप कुमार पांडे यांचा मृत्यू
या हल्ल्यावेळी दोघे युवक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र अनुप हत्तीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
झारखंड राज्यातील गुमला (BJP) जिल्हा येथे पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात ३२ वर्षीय भाजप युवा नेते अनुप कुमार पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावावर शोककळा पसरली आहे.
अनुप पांडे हे बुरहू गावात पॉवर ग्रिड पीएसएस ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. सकाळी कामावर जात असताना त्यांनी बुरहू पात्राजवळ लोकांची गर्दी पाहिली. चौकशी केली असता त्या ठिकाणी जंगली हत्ती आल्याची माहिती मिळाली. अनुप यांनी तत्काळ व्हॉट्सॲपद्वारे परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. मात्र, परिस्थिती पाहण्यासाठी ते स्वतः दोन जणांसह काही अंतरावर गेले. याच वेळी हत्तीने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यावेळी दोघे युवक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र अनुप हत्तीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ अनुप बाहेर न आल्याने स्थानिकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
वन विभागाकडून कुटुंबीयांना तातडीची २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, उर्वरित नुकसानभरपाई कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दिली जाणार आहे. अनुप पांडे यांनी भारतीय जनता पक्षच्या युवा मोर्चामध्ये महासचिव म्हणून काम केले होते.
नुकतीच त्यांची मंडळ महासचिवपदासाठी शिफारसही करण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर तसेच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनुप पांडे यांच्या निधनाला अपूरणीय हानी असल्याचे सांगत दुःख व्यक्त केले.