इतना सन्नाटा क्यूं है भाई? रिलायन्स कर्मचारी कपातीवर अनुपम मित्तल यांनी काय सांगितलं..
Reliance Workforce : देशात सध्या हिंडनबर्ग कंपनीचा अहवाल आणि अदानी समूह या दोघांचीच (Reliance Workforce) जोरदार चर्चा सुरू आहे. हिंडनबर्गच्या ताज्या अहवालात केलेले आरोप अदानी ग्रुपने (Adani Group) नाकारले आहेत. याच मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं आहे. त्यातच आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्समधील कर्मचारी कपातीचा मुद्दा तापू लागला (Reliance Job Cut) आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांनी हा मुद्दा सोशल मिडियावर मांडला आहे. या महत्वाच्या मुद्द्यावर इतकी शांतता कशी? असा सवालही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले अनुपम मित्तल?
शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी रिलायन्समधील कर्मचारी कपातीची एक बातमी सोशल मिडिया साईट एक्सवर पोस्ट केली आहे. 42 हजार? ही क्वाइट न्यूज आहे का? या बातमीने तर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात गंभीर धोक्याच्या घंटा वाजायला हव्या होत्या असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
42k? Why is this ‘quiet news’? Should be raising serious alarm bells across the economic & political circles 🤷🏻 https://t.co/L0XP0nnzHu
— Anupam Mittal (@AnupamMittal) August 10, 2024
एका युजरला उत्तर देताना मित्तल म्हणाले, आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी जर कर्मचारी कपात करत असेल तर रोजगाराची परिस्थिती आणखीच वाईट होते. आपल्याला प्रत्येक वर्षात साधारण 80 लाख ते एक कोटी नोकऱ्यांची गरज आहे. यासाठी रिलायन्स कंपनीच्या मदतीने प्रयत्न करायला हवेत असे नाही तर यासाठी एका धाडसी योजनेवर तत्काळ काम सुरू करण्याची गरज आहे.
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स
रिलायन्स इंडस्ट्रिज मार्केट कॅप हिशोबाने भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीत 3 लाख 47 हजार 362 कर्मचारी होती जे 2022-23 मधील 3 लाख 89 हजार 414 या कर्मचारी संख्येच्या तुलनेत कमी होते. कंपनीने कर्मचारी भरतीतही एक तृतीयांश कपात केली आहे. आता ही संख्या 1 लाख 71 हजार 116 इतकीच राहिली आहे. कंपनीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वार्षिक अहवालातून सर्वाधिक नोकऱ्यांची कपात रिटेल बिजनेसमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
रिलायन्सच्या 42 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; रिपोर्टने सगळेच केले उघड
किती जणांनी स्वतःहून नोकरी सोडली
रिलायन्सने अहवालात म्हटले आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात स्वतःहून नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 2022-23 च्या तुलने कमी आहे. रिटेल इंडस्ट्रीत साधारणपणे कर्मचाऱ्यांचा टर्न ओव्हर जास्त असतो. कर्मचारी लाभ व्यय तीन टक्के वाढून 25 हजार 699 कोटी रुपये झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हे प्रमाण 33 टक्के इतकं होतं.
या कारणामुळे झाली कर्मचारी कपात
कंपनीचे परिचालन व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. कपातीचा निर्णय योग्यच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. परंतु आर्थिक प्रभावाच्या बाबतीतही काही गोष्टी यातून स्पष्ट होत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज मोठी कंपनी आणि त्यात मोठी कर्मचारी कपात अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने उभी राहत असल्याचे संकेत देत तर नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.