इंधनाचे दर कमी होणार? इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कातून सुट, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कात सुट देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून त्यामुळे आता पेट्रोलचे दर घटण्याची शक्यता आहे.
Ethanol Petrol Tax : केंद्र सरकारकडून इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कातून (Ethanol Petrol Tax ) सुट जाहीर केलीयं. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे E20 इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या मिश्रणासाठी अर्थिक आधार मिळणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून अधिसूनेनुसार 22 ते 20 टक्के इथेनॉलयुक्त पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पेट्रोलमध्ये मिसळलेल्या इथेनॉलच्या प्रमाणानुसार, E22, E25, E27 आणि E30 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिश्रणांना ही सवलत लागू असणार आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंधनाची आयात करणारा देश आहे. देशात जैव-इंधनाचा (biofuel) वापर वाढवणे आणि आयातीमध्ये कच्च्या तेलाची आयात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ने (BIS) ‘E20’ पेक्षा अधिक इथेनॉल-पेट्रोल मिश्रणांसाठी इंधनाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित केल्यानंतर उत्पादन शुल्कातून सुट देण्यात आलीयं.
‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेल्या BIS अधिसूचनेद्वारे IS 19850:2026 अंतर्गत E22, E25, E27 आणि E30 इंधनांसाठी मानके निश्चित करण्यात आली आहेत. या मानकांमध्ये इथेनॉलचे प्रमाण, ऑक्टेन पातळी, सल्फरचे प्रमाण, बाष्प दाब, अशुद्धतेच्या मर्यादा, चाचणी पद्धती आणि सुरक्षा नियम यांसारख्या बाबींचा समावेश आहे.
उद्योग क्षेत्रातील अहवालांमध्ये नमूद केलेल्या अधिसूचनेनुसार, ही मानके 15 मे 2026 रोजी लागू झालीयं. भारताने ‘फ्लेक्स-फ्यूल’ वाहनांसाठी E85 इंधन बाजारात आणल्यानंतर काही दिवसांतच उत्पादन शुल्कातील ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. सरकारी इंधन कंपन्या E85 इंधनाची विक्री E20 इंधनाच्या दरापेक्षा प्रति लिटर सुमारे २० रुपये कमी दराने करतील, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.