गुवाहाटीतील CJPच्या पहिल्याच स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव; सह-संयोजक आशुतोष रांका ताब्यात
CJP’s First Volunteer Meet in Guwahati: गुवाहाटीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पहिल्या प्रादेशिक स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव.
CJP’s First Volunteer Meet in Guwahati: गुवाहाटीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पहिल्या प्रादेशिक स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांनी मज्जाव केल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. मेळाव्याच्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावत परिसरात नाकेबंदी केली. कार्यक्रमाला जाणारे पक्षाचे सह-संयोजक आणि मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह काही स्वयंसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पक्षाच्या माहितीनुसार, आसाम सचिवालयासमोर असलेल्या चौधरी टिल्ला परिसरात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तास आधी या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. तसेच अश्रुधुराचे साहित्य तैनात करण्यात आल्याचा आरोप CJPने केला आहे. गुवाहाटीत दाखल झालेले आशुतोष रांका आणि त्यांच्यासोबतचे स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी जात असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं.
ताब्यात घेतलेल्या स्वयंसेवकांची नेमकी संख्या आणि त्यांना कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे, याबाबत प्रशासनाकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्याचा CJPचा दावा आहे. या कारवाईमागचं अधिकृत कारणही स्पष्ट करण्यात आलेलं नसल्याचं पक्षाने म्हटलं आहे.
‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
दरम्यान, हा मेळावा आधी आठगाव येथील आसाम श्री परशुराम सेवा सदन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आसाम आणि ईशान्य भारतातील 500 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याचा दावा पक्षाने केला. मात्र, व्यवस्थापनावर दबाव आणून कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप CJPने केला आहे. त्यानंतर मेळाव्याचं ठिकाण चौधरी टिल्ला येथे बदलण्यात आलं.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी CJPची चार सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी टीम 23 सप्टेंबरपासून गुवाहाटीत कार्यरत असल्याचं पक्षाने सांगितलं आहे. या टीममध्ये अंकित भारद्वाज, आकाश प्रेम, वरुण अग्रवाल आणि अनम यांचा समावेश असल्याचं पक्षाकडून नमूद करण्यात आलं.
UNGAमध्ये जयशंकरांचा पाकिस्तानला थेट इशारा; ‘दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स’ कायम
ताब्यात घेण्यापूर्वी आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर पोलिसांच्या नाकेबंदीचे फोटो शेअर करत राज्य सरकारवर सवाल उपस्थित केला. ‘ आसाम राज्य सरकार CJPला इतकं का घाबरत आहे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावरही त्यांनी टीका केली.
रांका यांच्या पोस्टनंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना लक्ष्य करत ‘हिमंता, इतकी भीती का वाटतीये?’ असा सवाल केला.
जब जब हिमंता डरता है, पुलिस को आगे करता है। pic.twitter.com/eYYOV1lG0N
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) September 27, 2026
CJP आणि आसाम प्रशासनातील वादाचा संदर्भ देताना पक्षाने जुलै 2026 मधील एका घटनेचाही उल्लेख केला आहे. लखीमपूर जिल्ह्यात CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याप्रकरणी काही तरुण नेत्यांना ताब्यात घेतल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यानंतर 28 जुलै रोजी आसाम सरकारने आंदोलनकर्त्यांवरील पाच गुन्हे मागे घेण्याची आणि 13 जणांची सुटका करण्याची घोषणा केल्याचं CJPने म्हटलं आहे.
SIR प्रक्रियेत मोठा दिलासा! नोटीस मिळालेल्यांच्या घरीच BLO जाणार; निवडणूक आयोगाचा निर्णय
दरम्यान, सध्याच्या कारवाईनंतरही आसाममधील काम सुरूच ठेवण्याचा निर्धार CJPने व्यक्त केला आहे. ‘स्कूल ठीक करो’ ही शिक्षण मोहीम तसेच मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणामुळे नावे वगळल्या गेलेल्या कुटुंबांना मदत करण्याच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचं पक्षाने सांगितलं.
आशुतोष रांका यांच्यासह ताब्यात घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांची तात्काळ आणि विनाअट सुटका करावी, अशी मागणी CJPने केली आहे. तसेच पोलिसांची नाकेबंदी आणि कार्यक्रमस्थळाची परवानगी रद्द करण्यामागचं कारण आसाम सरकारने स्पष्ट करावं, अशी मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे.