जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला; तीन जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून मदतकायर्य सुरू

Cloudburst in Ramban District of Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे. (Jammu) मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीमुळे किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक घरं व वाहनं भूस्खलनात गाडली गेली आहेत. या संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
महामार्गबंद
नाशरी ते बनिहाल दरम्यान जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) वर सुमारे एक डझन ठिकाणी भूस्खलन आणि मातीची झडप पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर अजूनही मुसळधार पाऊस सुरूच असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती साचल्यामुळे वाहने अडकून पडली आहेत.
धरम कुंड गावात भीषण पूर
रामबनच्या धरम कुंड गावात अचानक आलेल्या पूरामुळे जवळपास 40 घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. गावात अनेक ठिकाणी पाणी शिरल्यामुळे लोकांनी घाबरून उंच भागात आसरा घेतला. स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन विभागाच्या पथकांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत, 100 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी
संपूर्ण गावात उफानलेल्या नाल्यांमुळे अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, नदी-नाल्यांमध्ये अचानक वाढलेला पाण्याचा स्तर लोकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी श्रीनगर महामार्गाचा वापर न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पावसामुळे घरात पाणी, वृद्ध-रुग्ण अडचणीत
पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे. वृद्ध, लहान मुले आणि रुग्ण या परिस्थितीत विशेषतः त्रस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी अन्न, औषधं आणि निवाऱ्याची व्यवस्था करणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरु
प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व मदत कार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाचे पथक संकटग्रस्त भागांमध्ये तातडीने काम करत आहेत. खराब हवामान आणि दुर्गम भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत असूनही प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पर्यटकांना सावधगिरीचा इशारा
काश्मीरमध्ये सध्या घनदाट धुके आणि पावसामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि प्रवाशांना हवामानात सुधारणा होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, प्रशासनाने स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुढील 48 तास काश्मीर खोर्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा जारी केला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.