CM फडणवीस दिल्लीत! PM मोदींची घेतली भेट, नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी उभयतांत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.
क्रिएटिव्हीटीला बळ! मुंबईत होणार आयआयसीटी, केंद्रांचाही निधी; CM फडणवीसांनी केली घोषणा
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. यानिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
IICT जागतिक दर्जाची क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था
“इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था केवळ चित्रपट निर्मिती पूरती मर्यादित न राहता डिजिटल कंटेंट, (व्हीएफएक्स), अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.” मुंबईतील IIT बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई जागतिक क्रिएटिव्ह हब बनणार
“मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतच होणार, CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती