विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी; काँग्रेस पक्ष आक्रमक

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Rrahul Gandhi

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर (Rahul Gandhi) आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.

केरळच्या एका न्यूज चॅनलवर लडाखमध्ये उफाळलेल्या हिंसाचारावर चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात भाजपची बाजू मांडताना एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष पिंटू महादेव यांनी म्हटलं की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल. पिंटू महादेव हे अनेक चॅनलवर भाजपची बाजू मांडताना दिसतात.

राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू – भाजप नेत्याची खुलेआम धमकी, त्यानंतर

या प्रकरणाची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. सुरुवातीला तुम्ही राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरून त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, आता तर तुम्ही त्यांना गोळी मारण्याची भाषा करत आहात, असं या पत्रात वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पत्रात पुढे असं देखील म्हटलं आहे की, राहुल गांधी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची आधीच हत्या झाली आहे. गांधी कुटुंबाने आपल्या घरातील दोन व्यक्तींना गमावलं आहे. हे पत्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं असून, ते अनेक नेत्यांना टॅग देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, दुसरीकडे राहुल गांधी यांना मिळालेल्या धमकीवरून सुप्रिया श्रीनेत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. मला राहुल गांधी यांच्या सुरक्षेची चिंता होत आहे. मला वाटतं त्यांना धोका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

follow us