ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

  • Written By: Published:
ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

22 Naxalites gunned down during encounter in Chhattisgarh’s : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत तब्बल 22 नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे. तर, DRG चा (डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड) एक जवान शहीद झाला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गंगलूर पोलीस हद्दीतील बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाले आहे, अशी माहिती बिजापूर पोलिसांनी दिली आहे. चकमक अजूनही सुरू असून, सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर पोलिसांना गंगालूर परिसरातील आंद्रीच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर, पोलीस आणि सुरक्षा दलांची संयुक्त टीम त्या भागात पाठवण्यात आली. जवानांना येताना पाहून येथे उपस्थित असलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलानेदेखील तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. दोन ठिकाणी झालेल्या या चकमकीत एकूण 22 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एक जवान शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. तर, कांकेरमध्ये चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात विजापूर परिसरातही एक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली होती. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले होते. तर, दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये यावर्षी आतापर्यंत 71 नक्षलवादी मारले गेले आहेत तर, 2024 मध्ये जवानांनी केलेल्या वेगवेगळ्या चकमकीत सुमारे 300 नक्षलवादी मारले आहेत आणि 290 शस्त्रे देखील जप्त केली आहेत.

पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार 

छत्तीसगढमध्ये केलेल्या मोठ्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आज आपल्या सैनिकांनी ‘नक्षलमुक्त भारत मोहिमे’च्या दिशेने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर येथे सुरक्षा दलांच्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 22 नक्षलवादी ठार झाले.

मोदी सरकार नक्सलवाद्यांविरोधात रुथलेस अप्रोचने पुढे जात असून, आत्मसमर्पणापासून ते समावेशापर्यंतच्या सर्व सुविधा असूनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाही त्यांच्याविरोधात झिरो टॉलरेंसची निती स्वीकारली जात असून, पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube