घटस्फोटित मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय
नवी दिल्ली : तिहेरी तलाक बंदीनंतर मुस्लीम महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय समोर येत आहे. घटस्फोटित मुस्लीम महिला ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार पतीकडून पोटगीची मागणी करु शकतात, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार मिळाला आहे. पत्नीला पोटगी देण्याच्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला एका मुस्लिम व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर बुधवारी सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
‘लाइव्ह लॉ च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार घटस्फोटित पत्नी पतीकडून पोटगीची मागणी करु शकतात, असा मोठा निर्णय दिला. ‘मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा 1986’ धर्मनिरपेक्ष कायद्याला ओव्हरराइड करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती नागरथना आणि न्यायमूर्ती मसिह यांनी स्वतंत्र, पण एकमताने निकाल दिला.
BREAKING| Divorced Muslim Woman Can Seek Maintenance From Husband Under S.125 CrPC : Supreme Court#SupremeCourt https://t.co/nAa7bhK3Pn
— Live Law (@LiveLawIndia) July 10, 2024