पगार मागितला म्हणून तरुणाला मारहाण, तोंडात चप्पल कोंबली; महिला बॉस बनली ‘लेडी डॉन’
Gujarat Crime: एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे दलितांवर सातत्याने अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अशीच एक क्रुर आणि किळसवाणी घटना गुजरातमधून समोर आली. गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. 15 दिवसांच्या थकीत पगार मागितला असता कंपनीचा मालकासह 6 जणांनी मारहाण केल्याचं पीडिताने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश किशोरभाई दलसानिया असे पीडित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नीलेशने पोलिसांत तक्रार दाखल केली. निलेशने ऑनलाइन एफआयआर दाखल केला आहे. त्यात त्याने म्हटले की, तो राणीबा इंडस्ट्रीजच्या एक्स विभागात काम करायचा. त्याला 2 ऑक्टोबर रोजी कामावर घेण्यात आले. मात्र 18 ऑक्टोबर रोजी त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. कंपनी दर 5 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांना पगार देते. त्यामुळे तो त्या तारखेची वाट पाहू लागला. पगार न मिळाल्याने 6 नोव्हेंबर रोजी त्याने कंपनी मालक विभूती पटेल यांना फोन करून याबाबत माहिती दिली.
‘अजित पवार गटाला पक्षावर ताबा हवाय म्हणून हा सगळा कट’; शरद पवार गटाच्या वकिलांचा आरोप
त्यावर मालकीनेने सांगितले की, मी चौकशी करून सांगते. त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एके दिवशी ओम पटेल याने फोन करून तरुणाला धमकावले आणि फोन करून बहिणीचा छळ का करतो, अशी विचारणा केली. पगार देणार नसल्याचेही त्याने सांगितले. यापुढे माझ्या बहिणीला फोन करू नकोस, असं ठणकावूनही बजावलं.
पगार न मिळाल्याने पीडित तरुण हा आपला भाऊ आणि शेजाऱ्यासह राणीबा इंडस्ट्रीजच्या कार्यालयात गेला. त्याचवेळी तरुणाने ओम पटेलला फोन केला. यानंतर कंपनी मॅनेजर परीक्षित आणि कंपनीतील अन्य 6 जणांनी या तरुणाला लिफ्टमध्ये ओढले आणि बेदम मारहाण केली. यावेळी सर्वांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केली. एवढेच नाही तर त्याला बाजूला घेऊन माफी मागतानाचा व्हिडिओही शूट करून घेतला. यामध्ये पीडित तरुण व त्याच्या मित्राने खंडणी मागितल्याचे सांगण्यास भाग पाडले. परत कधीही फोन करून पैसे मागणार नाही, असंही वदवून घेतलं. यानंतर पुन्हा विभूती, ओम आणि राज पटेल यांनी बेल्टने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी मोरबी पोलिस ठाण्यात विभूती पटेलसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर विभूती पटेल आणि तिचे साथीदार फरार असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
मोरबीचे डीएसपी पी.ए. झाला यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. मात्र तेथे कोणीही आढळून आले नाही. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित नीलेश सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.