Video : ‘मोदीजी, मलाही तुमच्यासारखं व्हायचं’; चिमुकल्याच्या उत्तराने मोदीही हसले
Karnataka Elections : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी (karna) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी असे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. जाहीर सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या राजकीय प्रचारात असेही काही हलकफुलके प्रसंग घडत आहेत. जे लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक खास प्रसंग आज घडला. पंतप्रधान मोदी यांनी चिमुकल्यांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारण्यात मोदीही रमले. त्यांनी मुलांना विचारलेल्या प्रश्नांना मिळालेली उत्तरेही अभिमान वाटावा अशीच होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH | Karnataka: Prime Minister Narendra Modi had a light-hearted interaction with children in Kalaburagi earlier today, before the roadshow here. pic.twitter.com/HYOoei56xf
— ANI (@ANI) May 2, 2023
या व्हिडीओत पीएम मोदी कर्नाटकातील कलबुर्गी येथील लहान मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. मुलेही त्यांना हसून प्रत्युत्तर देत आहेत. मोदी विचारतात की तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचे, तर एक मुलगा म्हणतो मला डॉक्टर व्हायचे, दुसरा म्हणतो पोलीस बनायचे आहे. त्यावर मोदी म्हणतात की तुमच्यापैकी कुणालाही पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही का, त्यांच्या या प्रश्नावर एका मुलानेही सर्वांनाच आवडेल असे उत्तर दिले. तो म्हणाला, की मोदीजी मला तुमच्यासारखे व्हावेसे वाटते.
दरम्यान, येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यंदा काँग्रेसही जोरदार टक्कर देताना दिसत आहे. तर दुसरीकडे वयाची नव्वदी पार केलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा जेडीएसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.