तेलंगणा पेपरफुटीप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिली कट रचल्याची कबुली
तेलंगणा : भारतीय जनता पार्टी (भाजप) तेलंगणाचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी तेलंगणा पेपर लीक प्रकरणात कट रचल्याची कबुली दिली आहे. तेलंगणा सरकारने आज सकाळी याबाबत माहिती दिली. बुधवारी पहाटे संजय कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केले. वारंगल पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड अहवालात तेलंगणा भाजप अध्यक्षांनी कटाची कबुली दिल्याचे नमूद केले आहे. या अहवालात बंदी संजय कुमार यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून ते सध्या पेपरफुटी प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली सध्या पोलिस कोठडीत आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांनी संजय कुमार यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. मंगळवार मध्यरात्री करीमनगर पोलिसांनी संजय यांना अटक केली. तेलंगणात सध्या दहावीच्या परिक्षा सुरू आहेत. मात्र, 10 वी बोर्ड परीक्षेचा पेपर मंगळवारी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लीक झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षांच्या मुलाने प्रश्नपत्रिकेचा फोटो क्लिक केला आणि परीक्षेपूर्वी शेअर केला. पोलिसांनी सांगितले की, हा पेपर इन्स्टंट मेसेजिंग अॅपवरील एका ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता आणि नंतर आरोपींपैकी एकाने तो इतर ग्रुपमध्ये शेअर केला होता. याच आरोपीने संजय कुमार यांनाही हा लीक पेपर पाठवला होता.
हा पेपर सोशल मीडियावर पसरल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पेपर लीक करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मित्राला पकडले आणि अॅपवर प्रश्नपत्रिका फिरवणाऱ्या अन्य दोघांनाही अटक केली. शिक्षण विभागाकडून जिल्हा अधिकारी आणि पोलिसांच्या माध्यमातून कसून तपास करण्यात आला. ही घटना गैरवर्तनाची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्यानुसार संबंधित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
संजय कुमार यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी बोलण्यापूर्वी त्यांनी आपली स्वत:ची पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्र जनतेसमोर ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता पंतप्रधान मोदी हे 8 तारखेला तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीने भाजप प्रदेशाध्यक्षालाच अटक करून भाजपची कोंडी केली आहे.