लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात भाजपला मिळाले ‘बॉस’ : UP मधील बाहुबली नेते नवे इन’चार्ज

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात भाजपला मिळाले ‘बॉस’ : UP मधील बाहुबली नेते नवे इन’चार्ज

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची नुकतीच मुदत संपली आहे. आता प्रचाराचा कार्यारंभ होणार आहे. अशात भाजपला महाराष्ट्र नवे बॉस मिळाले आहे. महाराष्ट्र भाजपच्या (BJP) प्रभारी पदी उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते, राज्यसभेचे खासदार डॉ. दिनेश शर्मा (Dinesh Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून प्रभारीपद रिक्त होते. (Member of Rajya Sabha Dr. Dinesh Sharma has been appointed as in charge of Maharashtra BJP)

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जुलै महिन्यात केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली होती. यातून राष्ट्रीय महासचिव असलेल्या सी. टी. रवी आणि दिलीप सैकिया यांना केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्यांच्या जागी तेलंगाणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार आणि उत्तर प्रदेशचे खासदार राधामोहन अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. सी. टी. रवी हे त्यावेळी महाराष्ट्र भाजपचे प्रभारी होते. मात्र त्यांना भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याने प्रभारीपदीही नवीन चेहरा येणार असल्याचे निश्चित मानले जात होते.

कोण आहेत दिनेश शर्मा :

दिनेश शर्मा राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. यापूर्वी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री आणि उपमुख्यमंत्रीही होते. याशिवाय त्यांनी लखनौचे माजी महापौरपदही भुषविले आहे. विद्यार्थीदशेतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकाही जिंकल्या आहेत. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून बी.कॉमचे शिक्षण असून मानसशास्त्र आणि मानव विकास या विषयात एम.कॉम, पीएचडी केली आहे. महापौर होण्यापूर्वी दिनेश शर्मा लखनौ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

अटलबिहारी वाजपेयी आणि दिनेश शर्मा

2006 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिनेश शर्मा यांच्यासाठीच आपले शेवटचे भाषण केले होते. त्यानंतर वाजपेयी सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र तिथूनच शर्मा यांचा प्रवास सुरु झाला. 2008 मध्ये प्रथमच ते लखनौचे महापौर म्हणून निवडून आले. 2012 मध्येही शर्मा पुन्हा लखनौचे महापौर बनले. उत्तर प्रदेश 2017 च्या निवडणुकीनंतर दिनेश शर्मा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube