NAAC : कॉलेज, युनिव्हर्सिटींना गुणवत्ता रँक देणारी नॅक वादात का?

  • Written By: Published:
NAAC : कॉलेज, युनिव्हर्सिटींना गुणवत्ता रँक देणारी नॅक वादात का?

तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड (NAAC) काय आहे, हे सांगितलं जात. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो. कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे, ते कॉलेज चांगले असं मानलं जात पण गेल्या काही दिवसापासून नॅक वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे काय आणि सध्या चालू असलेला नॅकमधील वाद काय आहे, हेच आपण जाणून घेऊ.

नॅकमधील वाद काय ?

सध्या नॅक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे डॉ. भूषण पटवर्धन यांचा राजीनामा आणि त्यांनी नॅकवर केलेले आरोप. भूषण पटवर्धन हे नॅकच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष होते. पटवर्धन यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये नॅकच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पटवर्धन यांनी नॅकतर्फे केल्या जाणाऱ्या ग्रेडवर प्रश्न उपस्थित केले आहे. ग्रेड देणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्यामुळे काही महाविद्यालयांना चांगली ग्रेड दिली जाते, असा आरोप त्यांनी केला होता.

२६ फेब्रुवारी रोजी पटवर्धन यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून हाच प्रश्न पुन्हा उपस्थित केला पण या पत्रामध्ये त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. या पत्रामुळे नॅक मधला आणखी एक वाद समोर आला. कारण पटवर्धन यांची इच्छा हाच त्यांचा राजीनामा मानून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून एआयसीटीईचे माजी अध्यक्ष अनिल डी सहस्रबुद्धे यांची नॅकच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. यावर पटवर्धन यांनी आपण राजीनामा दिला नसून द्यायची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं पण राजीनामा दिला नसताना त्याजागी नवा अध्यक्ष नेमला गेल्याचं सांगितलं. शेवटी ५ मार्च रोजी पटवर्धन यांनी अधिकृतरीत्या राजीनामा दिला.

हेही वाचा : MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘शरद ‘शादाब’ असते तर…’

नॅक म्हणजे काय?

देशातील कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांची ग्रेडिंग करणारी एक सिस्टीम असावी यासाठी १९९४ साली नॅकची स्थापना करण्यात आली. नॅककडून देशभरातील शैक्षणिक संस्थांचे बहुस्तरीय मूल्यांकन केले जाते. मुल्याकंन करण्यासाठी अभ्यासक्रम, अध्यापनासाठी असलेले प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधा, शैक्षणिक संस्थांत केले जाणारे संशोधन तसेच संस्थेची आर्थिक स्थिती या सर्व बाबींचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्थेला मूल्यांकनानुसार ‘ए’पासून ‘सी’पर्यंत ग्रेड दिली जाते.

नॅक ग्रेडिंगची प्रक्रिया काय असते?

नॅक ग्रेडिंगसाठी शैक्षणिक संस्था नॅक ग्रेडिंगसाठी अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर नॅकची टीम संस्थेला भेट देते. संस्थेची तपासणी करतात. सोबत टीम कॉलेजच्या सुविधा, निकाल, पायाभूत सुविधा याची पाहणी करतात. या आधारावर नॅक टीम आपला अहवाल तयार करते. त्यातून कॉलेजला सीजीपीए दिला जातो आणि त्याच्या आधारे ग्रेड दिले जातात.

हेही वाचा : ‘काँग्रेस सरकारमध्ये वीज नव्हती, त्यामुळे लोकसंख्या वाढली’, केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

ग्रेड ४ वर्षांसाठी वैध

महाविद्यालयांना नॅक कडून ४ वर्षांसाठी ग्रेड दिले जातात. चार वर्षांनी पुन्हा रेटिंग दिले जाते. नॅकने तात्पुरते ग्रेड देण्याची व्यवस्थाही देखील केली आहे. या अंतर्गत २ वर्षांसाठी ग्रेड देण्यात येतील. जर कोणत्याही महाविद्यालयाचे व्यवस्थापन ग्रेडबाबत समाधानी नसेल, तर ६ महिन्यांत उणीवा दुरुस्त करून पुन्हा तपासणी करता येईल.

अशी असते ग्रेड

काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयॊगाने ग्रेडिंग पॅटर्न बदलला आहे. यापूर्वी महाविद्यालये चार श्रेणींमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र आता ते 8 श्रेणींमध्ये ठेवण्यात आली आहे. जर CGPA ३.७६ ते ४ दरम्यान असेल, तर कॉलेजला A+ प्लस ग्रेड मिळेल. म्हणजे कॉलेज सर्वोत्तम आहे. त्याचप्रमाणे सीजीपीएच्या आधारे ए प्लस, ए, बी प्लस प्लस, बी प्लस, बी, सी आणि डी ग्रेड दिले जातात.

विद्यार्थ्यांना काय फायदा

तर या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नॅक रेटिंगमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो. तर नॅक ग्रेडिंगमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेची योग्य माहिती मिळते. शिक्षणाचा दर्जा, संशोधन, पायाभूत सुविधा, यासारख्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे सोपे आहे. अर्थात नॅक ग्रेडिंगद्वारे विद्यार्थी स्वतःसाठी सर्वोत्तम महाविद्यालय शोधू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube