“आता विरोधकांनाही जास्त संधी द्याल”; बिर्लांना शुभेच्छा देत राहुल गांधींचीही कडी
Rahul Gandhi on Lok Sabha Speaker Post : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी (Lok Sabha Speaker Election) आज एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांनी (Om Birla) बाजी मारली. सभागृहात आवाजी पद्धतीने मतदान घेऊन यात ओम बिर्ला विजयी झाली. यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तुहरी महताब यांनी ओम बिर्ला अध्यक्षपदी निवडून आल्याचे घोषित केले. बिर्ला यांच्या निवडीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) सभागृहाला संबोधित केले. राहुल गांधींनी बिर्लांना शुभेच्छा दिल्या.
काय म्हणाले राहुल गांधी ?
राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हाला शुभेच्छा देतो विरोधकांकडून. देशातील जनतेचं प्रतिनिधीत्व करणारं हे सभागृ आहे. तुम्ही त्यात आहात. सध्या सरकारकडे राजकीय शक्ती आहे यात काहीच शंका नाही. पण विरोधक सुद्धा या देशातील जनतेचा आवाज आहेत. यावेळेस तर मागील वेळेच्या तुलनेत विरोधकांच्या माध्यमातून जनतेचा आवाज या सभागृहात वाढला आहे. या सभागृहाचं कामकाज चांगलं चालावं असं आम्हालाही वाटतं. विरोधकांनाही बोलण्याची संधी या सभागृहात मिळाली पाहिजे. मला खात्री आहे की तुम्ही विरोधकांनी बोलण्याची संधी द्याल.
सभागृह कसं चालेल हा खरा प्रश्न नाही तर खरा प्रश्न असा आहे की देशातील जनतेचा आवाज या सभागृहात किती प्रमाणात ऐकला जाईल. तुम्ही जर विरोधकांना शांत करुन सभागृह चालवायचं असं म्हणणार असाल तर ही संकल्पना लोकशाहीला धरून नाही. या निवडणुकीत हे दाखवून दिलं आहे की देशातील जनतेला संविधानाचं रक्षण करायचं आहे.
मोठी बातमी : लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्लांची पुन्हा निवड; ‘इंडिया’ आघाडीची खेळी फेल
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ओम बिर्ला यांनी (Om Birla) बाजी मारली. केरळमधील वायनाडची जागा रिक्त होती. सात जणांनी अद्याप शपथ घेतली नाही. त्यामुळे या निवडणुकीत 535 खासदार मत देण्यास पात्र होते. उमेदवाराला निवडून येण्यासाठी 267 बहुमताचा आकडा गाठायचा होता. त्यानुसार एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांनी बाजी मारली. संसदेत आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. राजनाथ सिंह यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. यानंतर आवाजी मतदान होऊन ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रोटेम स्पीकर भर्तुहरी महताब यांनी जाहीर केले.
सर्वसंमतीनेच अध्यक्ष निवडीचा इतिहास
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा गणेश वासुदेव मावळकर यांची निवड झाली होती. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वसंमतीने अध्यक्ष निवडले गेले आहेत. बाराव्या लोकसभेचं अध्यक्षपद टीडीपीच्या जीएमसी बालयोगी यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यानंतरच्या तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बालयोगी यांनाच नियुक्त करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षपदावर असतानाच हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांना अध्यक्ष करण्यात आले होते.
Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला