विरोधकांचा अविश्वासाचा डाव! खुद्द पीएम मोदीच ‘या’ दिवशी संसदेत देणार उत्तर
Parliament Session : संसदेच्या अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा गदारोळ सुरुच आहे. आजही लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज ठप्प पडले. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी बोलावे अशी विरोधकांची मागणी आहे. यासाठी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. यावर आता चर्चेची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
अविश्वास प्रस्तावावर येत्या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या काळात संसदेत चर्चा होणार आहे. 10 मे रोजी पंतप्रधान मोदी या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील. पंतप्रधान मोदी या मुद्द्यांवर काहीच बोलत नसल्याने विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मात्र संसदेत सरकारकडे बहुमत आहे त्यामुळे विरोधकांच्या या राजकीय डावाचा सरकारवर काहीच परिणाम होणार नाही हे निश्चित आहे.
लोकसभेत उद्या INDIA ची अग्निपरीक्षा; केंद्र सरकार आणणार अध्यादेश
मणिपूर राज्यात 3 मे पासून हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. येथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. विरोधी पक्षातील खासदारांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी मणिपूरचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी संसदेत या मुद्द्यावर सविस्तर निवेदन द्यावे अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकार मणिपूरवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. मात्र विरोधकांनी मोदींनीच निवेदन देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठीच अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे.
दिल्लीचा अध्यादेशही धडकणार
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक आज लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा हा अध्यादेश सादर करणार आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सुरुवातीपासूनच या अध्यादेशाच्या विरोधात आहे. यासोबतच त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबाही मागितला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनीही आपचे राष्ट्रीय संयोजक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.