भाजपाचा रिपीट फॅक्टर, काँग्रेसचे ‘सिनियर कार्ड’; दिग्गजांना निवडणुकीशिवाय नाही पर्याय

भाजपाचा रिपीट फॅक्टर, काँग्रेसचे ‘सिनियर कार्ड’; दिग्गजांना निवडणुकीशिवाय नाही पर्याय

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने दोन (Lok Sabha Election) दिवसांपूर्वी दुसरी यादी जाहीर केली होती. पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही याद्यांवर बारकाईने नजर टाकली तर असे लक्षात येते की भाजप या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही. तसेच या याद्यांमध्ये रिपीट फॅक्टर जरा जास्तच दिसत आहे. या माध्यमातून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की विद्यमान खासदारांच्या विरोधात कोणतेही नकारात्मक वातावरण नाही.

दोन्ही याद्यांवरून असे दिसून येत आहे की भाजपने 140 उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. तर एकूण 63 खासदारांचा पत्ता कट केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राजधानी दिल्ली शहरातील सात पैकी सहा मतदारसंघात उमेदवार बदलले आहेत. हरियाणात तीन खासदारांना नारळ दिला आहे. कर्नाटक मध्ये 11 जणांना तिकीट नाकारण्यात आले आहे. मध्य प्रदेशात दोन जणांचे तिकीट कापले तर दोन उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात वीस पैकी पाच विद्यमान खासदारांना संधी नाकारली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीचा विचार केला तर यामध्ये 195 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. यामध्ये 33 खासदार असे आहेत की ज्यांना पुन्हा तिकीट मिळाले नाही. 110 खासदारांना मात्र पुन्हा संधी मिळाली. उर्वरित मतदारसंघात कुणाच्याही चर्चेत नसलेल्या नवीन चेहऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. दुसऱ्या यादीत भाजपने बऱ्यापैकी संतुलन साधले आहे. 30 उमेदवारांना रिपीट करण्यात आले तर 30 खासदारांना संधी नाकारली. या व्यतिरिक्त 12 नव्हं नवीन उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.

Mahadev Jankar : ‘परभणी’ की ‘माढा’? जानकरांचं ठरलं! दोन्ही मतदारसंघात ठोकणार शड्डू

यामध्ये आणखी एक गोष्ट ठळक दिसते ती म्हणजे भाजपने यावेळी अशा मंत्र्यांना रिंगणात उतरवले आहे जे एकतर निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते किंवा राज्यसभेच्या माध्यमातून सरकारमध्ये एन्ट्री घेण्याच्या प्रयत्नात होते. याच कारणामुळे केंद्रीय मंत्री पियूष गोयल, महाराष्ट्र सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या मैदानात दिसत आहेत. पहिल्या यादीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनाही अशाच पद्धतीने तिकीट देण्यात आले.

मोठ्या नेत्यांनी किमान एकदा तरी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते त्यानुसार आता भाजपने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. म्हणुनच नागपुरातून नितीन गडकरी रिंगणात आहेत तर करनाल मधून हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दावेदारी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अनिल बलूनी यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुद्धा भाजपने हवेरी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. बीड मधून भाजप नेत्या पंकजा मुंडे, हरिद्वार मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाच्या प्रत्येक मोठ्या नेत्याला निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही असा स्पष्ट संदेश पक्ष नेतृत्वाने दिला आहे.

Loksabha Election : देशासह महाराष्ट्रात भाजपाची गाडी सुस्साट; निवडणुकांपूर्वीच अर्धी लढाई खिशात

काँग्रेसने उतरवली दिग्गजांची फौज  

काँग्रेसने सुद्धा दोन याद्यांत अनेक दिग्गज नेत्यांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवा आणि विजयी व्हा असा करेक्ट मेसेज काँग्रेस हायकमांडने उमेदवारांना दिला आहे. या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल, शशी थरुर, काँग्रेस नेते राहुल गांधी, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ताम्रध्वज साहू, ज्योत्स्ना महंत कोरबा, डिके सुरेश यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत काँग्रेस भाजपला आव्हान देताना दिसेल अशी काळजी घेण्यात आली आहे. यासाठी तिकीट देताना कोणत्या उमेदवाराची किती राजकीय ताकद आहे याचा विचार केला आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूर तर विधानसभेचे माजी सभापती आणि काँग्रेसमधील मोठे नेते सीपी जोशी यांनी जयपूर ग्रामीण मतदारसंघातून लढावे यासाठी पक्ष नेतृत्वाकडून दबाव टाकला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनाही निवडणुकीसाठी तयार केले जात असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर डोळा  

महाराष्ट्राचा विचार केला तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सुद्धा गळ घातली जाऊ शकते. दुसऱ्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट देण्यात आले आहे.

एकूणच काय तर यंदा काँग्रेसने सुद्धा जोर लावला आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा मिळेल इतक्या सुद्धा जागा मिळाल्या नव्हत्या. अशा स्थितीत यावेळच्या निवडणुकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट देऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्लॅन दिसत आहे. बडे नेते निवडणुकीत असले की त्यांचा प्रभाव आसपासच्या मतदारसंघांवर सुद्धा पडतो असा अंदाज काँग्रेस नेतृत्वाचा आहे. तसेच मोठे नेते असले तरी त्यांना सुद्धा मागच्या दाराने प्रवेश मिळणार नाही त्यांना निवडणूक लढवावीच लागेल असा मेसेज काँग्रेस हायकमांडने या दोन्ही याद्यांतून दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज