‘डोळा लागला, आवाज ऐकून उठलो, पाहतो तर प्रेतांचा खच अन् करुण किंकाळ्या’; प्रवाशाने सांगितली आपबीती
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये काल झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात (Odisha Train Accident) दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण, या रेल्वे गाड्यात आणखी बरेच प्रवासी फसले आहेत. ज्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
या अपघातात काही जण सुदैवाने बचावले असून त्यांनी या अपघाताची भयावहता सांगितली. अपघातानंतर कुटुंबे विखुरली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. आक्रोश, किंकाळ्या ऐकू येत होत्या. कोलकातापासून 250 किलोमीटर आणि ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 170 किलोमीटर अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री सात वाजता हा भीषण अपघात झाला.
या घटनेत दोन रेल्वे व्यतिरिक्त एक मालगाडीचाही समावेश होता. बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे तीन डबे चक्काचूर होऊन रुळावरून खाली उतरले. तसेच कोरोमंडल एक्सप्रेसचे 13 डबे ज्यामध्ये सामान्य, स्लीपर, एसी 3 टियर आणि एसी 2 टियर डबे समाविष्ट होते.
येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले, आम्ही जोराचा आवाजे ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. येथे काय पाहतो तर रेल्वेचे डबे रुळावरून खाली घसरले होते. स्टीलच्या तुटलेल्या ढिगाऱ्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहिले नव्हते. प्रवाशांनी सांगितले, नागरिकांना आमची मदत केली. सर्वत्र पसरलेल्या रक्त आणि मासांतून वाट काढत त्यांनी आमची मदत केली. आमचे साहित्य बाहेर काढले आम्हाली पाणी पाजले.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथील रहिवासी असलेल्या एका प्रवाशाने सांगितले की आम्हाला धक्का बसला. पाहिले तर ट्रेन एका बाजूला वळत आहे. ट्रेन झटक्याने रुळावरून खाली उतरल्याने अनेक लोक अक्षरशः बाहेर फेकले गेले. आम्ही कसेतरी या डब्यातून बाहेर पडलो पण ज्यावेळी बाहेर आलो अन् पाहिले तर आजूबाजूला प्रेतांचा खच पडलेला दिसला.
आणखी एक प्रवासी म्हटला, रात्र बरीच झाली होती त्यामुळे माझ्यासह सगळे प्रवासी झोपले होते. मलाही डोळा लागला. त्याचवेळी गाडी घसरली. मोठा आवाज झाला. त्यामुळे माझी झोपमोड झाली. मी कसाबसा त्यातून बाहेर पडलो. किती लोकांचा मृत्यू झाला हे तर मला माहिती नाही. पण, जेव्हा बोगीतून बाहेर पडलो तेव्हा पाहिलं की कुणाचा हात नव्हता, कुणाचा पाय कापला गेला होता. लोक किंचाळत होते, ओरडत होते, मदत मागत होते. माझ्या हाताला आणि मानेला जखम झाली आहे. पोलीस आणि इतर टीम त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.