“पेपरलीक झाला हे सत्य, फायदा घेणारे मुन्नाभाई शोधा”; NEET वादात सुप्रीम कोर्टही कठोर

“पेपरलीक झाला हे सत्य, फायदा घेणारे मुन्नाभाई शोधा”; NEET वादात सुप्रीम कोर्टही कठोर

NEET-UG Exam : देशभरात वादग्रस्त ठरलेल्या मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी 2024 रद्द (NEET UG Exam) करण्याच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसले. पेपर लिकमुळे किती जणांना फायदा झाला याची माहिती घ्या, असे न्यायालयाने सरकारला सुनावले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस जे बी पारदीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या पीठाने एकूण 38 याचिकांवर सुनावणी करताना सांगितले की पेपर तर लीक झाले आहेतच ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. या प्रवृत्तींचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले की परीक्षेचा लीक झालेला पेपर जर सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला गेला असेल तर पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश आम्हाला द्यावा लागेल. टेलिग्रॅम, व्हॉट्सअप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जर पेपर लीक होत असेल तर हा प्रकार वेगाने पसरेल अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.

पेपर लीक झाला हे एकदम साफ असून हा प्रकार नाकारताच येणार नाही. या प्रकारात दोषी कोण आहेत याची ओळख जर करता आली नाही तर परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. जर सरकार परीक्षा रद्द करणार नसेल तर मग पेपरलीकचे जे लाभार्थी आहेत त्यांची ओळख करण्यासाठी सरकार काय करणार असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस जेबी पारदीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या पीठाने केंद्र सरकारला केला.

NTA कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरात झालेल्या गोंधळानतर झाली होती पुनर्परीक्षा

पेपरलीक झाले यात शंका नाही पण याची व्याप्ती कुठपर्यंत आहे याची माहिती घेत आहोत. यामध्ये काही संकेत आहेत कारण 67 उमेदवारांनी 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. मागील काही वर्षांतील परीक्षांचा अभ्यास केला तर हे प्रमाण कमी होतं. आता पेपर लीक झाल्याने किती लोकांचा फायदा झाला आणि या लोकांविरुद्ध सरकारने काय कारवाई केली याची माहिती सरकारने द्यावी. चुकीचे काम करणाऱ्या किती उमेदवारांचा निकाल रोखण्यात आला, या लोकांची माहिती जाणून घेण्याची गरज आम्हाला वाटते असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे. येत्या 10 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एनटीए, केंद्र सरकार आणि सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. पेपरलीकचा फायदा ज्यांना कुणाला झाला असेल त्यांचा शोध घ्या तसेच ज्या केंद्र आणि शहरात पेपर लीक झाले त्याचीही माहिती द्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube