टाटा समूहासाठी कोण होते अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन? अचानक राजीनाम्यामने वृत्ताने उद्योगविश्वाला कसा बसला धक्का?

समूहाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी संकटमोचकाची भूमिका बजावत टाटा समूहाच्या परिवर्तनाला नवी दिशा दिली.

News Photo   2026 08 12T141228.987

टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांच्या अचानक राजीनाम्याच्या वृत्ताने देशातील उद्योगविश्वाला धक्का बसला आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या टाटा समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) काही दिवस आधी हा निर्णय जाहीर झाल्याने टाटा समूहातील एका महत्त्वपूर्ण पर्वाच्या समाप्तीची चर्चा सुरू झाली आहे. उद्योगविश्वात प्रेमाने ‘चंद्र’ म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखरन यांचे टाटा समूहातील स्थान केवळ सर्वोच्च पदापुरते मर्यादित नव्हते. समूहाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी संकटमोचकाची भूमिका बजावत टाटा समूहाच्या परिवर्तनाला नवी दिशा दिली.

तमिळनाडूतील एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रशेखरन यांनी १९८७ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) संगणक प्रणाली विकासक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सामान्य पदावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे टाटा समूहाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचला. केवळ गुणवत्ता, कष्ट आणि नेतृत्वक्षमतेच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे स्थान उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी ठरले.

टाटा समूहाच्या नेतृत्वाची जबाबदारी

ऑक्टोबर २०१६ मध्ये चंद्रशेखरन टाटा समूहाच्या संचालक मंडळात दाखल झाले आणि जानेवारी २०१७ मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. टाटा समूहाच्या इतिहासात या पदावर विराजमान होणारे ते पहिले गैर-पारशी आणि पूर्णतः व्यावसायिक व्यवस्थापक ठरले. सायरस मिस्त्री यांच्या वादग्रस्त हकालपट्टीनंतर निर्माण झालेला तणाव, समूहातील अंतर्गत मतभेद आणि विश्वासाचे संकट या सर्व आव्हानांना त्यांनी समर्थपणे सामोरे जात समूहाची घडी पुन्हा बसवली.

टीसीएसमधून टाटा समूहाच्या सर्वोच्च पदापर्यंत

चंद्रशेखरन यांना खऱ्या अर्थाने ‘टाटा लायफर’ म्हणता येईल. म्हणजेच ज्याने आपल्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत एकाच समूहात काम केले आणि त्याच संस्थेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत सर्वोच्च स्थान गाठले. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रशिक्षणार्थीपासून टीसीएसच्या नेतृत्वापर्यंत आणि तेथून संपूर्ण टाटा समूहाच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.

समूहाची पुनर्रचना आणि एअर इंडियाचे ‘घरवापसी’

चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतले. तोट्यातील कंपन्यांची पुनर्रचना, व्यवसायांचे एकत्रीकरण, डिजिटल क्षेत्रात टाटा न्यू या व्यासपीठाची उभारणी तसेच वाहन, विमान वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रातील विस्तार या त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख घडामोडी ठरल्या. यातील सर्वाधिक ऐतिहासिक निर्णय म्हणजे सरकारी मालकीची एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात आणणे. टाटा समूहाने यशस्वी बोली लावत एअर इंडियाचे अधिग्रहण केले आणि अनेक दशकांनंतर या विमान कंपनीची टाटा समूहात ‘घरवापसी’ झाली. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर आणि इंडियन हॉटेल्स कंपनी यांसारख्या प्रमुख कंपन्यांना जागतिक स्पर्धेत सक्षम ठेवण्यातही चंद्रशेखरन यांची भूमिका महत्त्वाची राहिली.

आर्थिक बळकटी आणि वाढता व्यावसायिक विस्तार

चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या आर्थिक सामर्थ्यात लक्षणीय वाढ झाली. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी समूहाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा टाटा समूहाची वार्षिक उलाढाल सुमारे १०३.२७ अब्ज डॉलर होती. ३१ मार्च २०२५ पर्यंत ती वाढून १८० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली. शंभरहून अधिक कार्यरत कंपन्यांचा समावेश असलेल्या या विशाल समूहाला त्यांनी आर्थिक स्थैर्यासोबतच भविष्यातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांसाठी सज्ज केले. विद्युत वाहननिर्मिती, अर्धसंवाहक निर्मिती, अक्षय ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये टाटा समूहाने या काळात मोठी गुंतवणूक केली.

जागतिक स्तरावर भारताची आणि टाटांची प्रतिष्ठा

उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने २०२२ मध्ये चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’ या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एकाने गौरविले. फ्रान्स सरकारनेही त्यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘लेजिऑन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले. इंडो-यूएस, इंडिया-यूके आणि बी२० यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी भारताच्या उद्योगविश्वाचे प्रतिनिधित्व केले. जागतिक स्तरावर भारतीय उद्योगाची भूमिका मांडण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.

टाटा समूहातील चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाचा गाभा म्हणजे वादांपासून दूर राहून कामगिरीला प्राधान्य, दूरदृष्टीने घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि टाटा समूहाच्या मूल्यांशी आधुनिक व्यवसायपद्धतीचा मेळ. त्यांच्या राजीनाम्यामुळे टाटा समूहातील एका यशस्वी आणि ऐतिहासिक नेतृत्वपर्वाची सांगता होत असल्याचे मानले जात आहे. शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला एका संगणक प्रणाली विकासकाचा प्रवास देशातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक समूहाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचला आणि आता या प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण अध्याय संपुष्टात येत आहे.

follow us