No Confidence Motion : ‘देशात आंधळा राजा’… काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ
No Confidence Motion : लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आघाडीचे सदस्य काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वक्तव्यावर चांगलेच खवळले. त्यांनी सभागृहात जोरदार गदारोळ घालत चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अविश्वास प्रस्तावावर बोलताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीशी केली. त्यामुळे सत्ताधारी सदस्य चांगलेच संतापले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौधरी यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणतेही आरोप सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
चौधरी पुढे म्हणाले, ज्यावेळी राजा आंधळा असतो. धृतराष्ट्र अंध होता त्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते. आताही आंधळाच राजा बसला आहे त्यामुळेच द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. मग ते हस्तिनापूर असो की मणिपूर, हे घडत आहे. प्रधानमंत्रीजी तुम्ही एकदा नाही शंभर वेळा पंतप्रधान व्हा आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्हाला याचे काहीच देणेघेणे नाही. भारतातील सामान्य जनतेशी आम्हाला देणेघेणे आहे. ज्यावेळी मणिपुरला गेलो तेथील अवस्था आम्ही पाहिली. त्यानंतर आम्हाला असे वाटले की देशाचा प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी एकदा तरी मणिपुरातील नागरिकांना काहीतरी संदेश द्यायला पाहिजे.
ब्रिटीशांची तरफदारी करणाऱ्या तुमच्या पूर्वजांनी देशासाठी हेच दान केलं होतं. क्रांती दिनी जो नारा दिला गेला होता तो काढून तुम्ही नवा नारा देत लोकांची दिशाभूल केली, असा आरोप चौधरी यांनी भाजपवर केला.