मन हेलावण्याऱ्या किंकाळ्या अन् आक्रोशानंतर ‘त्या’ स्टेशनवर स्मशान शांतता… काय आहे कारण?
CBI Seals Bahanaga Bazar Station:
ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघाताची सीबीआय चौकशी सुरु आहे. 2 जून रोजी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1,208 जण जखमी झाले होते. अशात सीबीआयच्या पथकाने आता ज्या स्टेशनजवळ हा अपघात झाला होता ते बहनगा बाजार स्टेशन सील केले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही ट्रेन स्टेशनवर थांबणार नाही.
सीबीआयने लॉग बुक आणि उपकरणे जप्त केल्यानंतर स्टेशन सील केले आहे. आता कोणालाही या स्टेशनवर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यापूर्वी ‘अप’ आणि ‘डाऊन’ दोन्ही मार्गावरील गाड्यांची वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर बहनगा बाजार स्थानकावर किमान सात गाड्या थांबल्या होत्या. दरम्यान, सीबीआयच्या या निर्णयाने बहनगाच्या स्टेशनवर स्मशान शांतता पसरली आहे. (odisha-train-accident-no-train-to-halt-at-bahanaga-bazar-station-till-further-orders-cbi-seals-station)
रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली
दक्षिण पूर्व रेल्वेचे (एसईआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी माध्यमांना सांगितले की सीबीआयने ‘लॉग बुक’, ‘रिले पॅनेल’ आणि इतर उपकरणे जप्त केल्यानंतर स्टेशन सील केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “रिले इंटरलॉकिंग पॅनल सील करण्यात आले आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही पॅसेंजर ट्रेन किंवा मालगाडी थांबणार नाही.
या गाड्या बहनगा बाजार येथे थांबत असत
अधिकाऱ्याने सांगितले की, बहनगा बाजार रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे 170 गाड्या जातात, परंतु फक्त भद्रक-बालासोर मेमू, हावडा भद्रक बागजतीन फास्ट पॅसेंजर, खरगपूर खुर्दा रोड फास्ट पॅसेंजर या गाड्या एक मिनिटासाठी थांबतात. चौधरी म्हणाले की, 1,208 जखमींपैकी 709 जणांना रेल्वेकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.