कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेचे नियम बदलले; जाणून द्या सर्वकाही

PF Account Transfer : केंद्र सरकारने (Central Government) एक मोठी घोषणा करत कोट्यवधी नोकरदारांना आनंदाची बातमी दिली आहे. माहितीनुसार, ईपीएफओने (EPFO) नोकरी बदलताना पीएफ खाते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. शुक्रवारी एका अधिकृत निवेदनात ईपीएफओकडून माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओने नियमांत बदल केल्यामुळे आता कंपनीकडून मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
याबाबत माहिती देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की आतापर्यंत दोन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) कार्यालये भविष्य निर्वाह निधी (PF) ठेवींच्या हस्तांतरणात सहभागी होती. यामध्ये एक स्रोत कार्यालय होते जिथून पीएफ रक्कम हस्तांतरित केली गेली आणि दुसरे डेस्टिनेशन ऑफिस होते जिथे शेवटी रक्कम जमा केली गेली. मात्र आता प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी, EPFO ने सुधारित फॉर्म-13 सॉफ्टवेअर प्रणाली सादर करून डेस्टिनेशन ऑफिसमध्ये सर्व हस्तांतरण दाव्यांच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकली आहे. अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे.
नियमांत बदल झाल्यामुळे आता एकदा स्त्रोत कार्यालयात हस्तांतरणाचा दावा मंजूर झाला की, मागील खाते आपोआप पुढील कार्यालयातील सदस्याच्या चालू खात्यात हस्तांतरित होईल, ज्यामुळे ईपीएफओ सदस्यांच्या सोयीचा उद्देश पूर्ण होईल. या सुधारित पद्धतीमध्ये पीएफ संचयातील करपात्र आणि करपात्र नसलेल्या घटकांचे विभाजन करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे करपात्र पीएफ व्याजावरील टीडीएस (स्रोतावर कर कपात) ची अचूक गणना करणे सोपे होते.
यामुळे 1.25 कोटींहून अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 90,000 कोटी रुपयांचे हस्तांतरण शक्य होईल, कारण संपूर्ण हस्तांतरण प्रक्रिया जलद होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. शिवाय, सदस्यांच्या खात्यांमध्ये त्वरित निधी जमा करण्यासाठी सदस्य आयडी आणि इतर उपलब्ध सदस्य माहितीवर आधारित एकाच वेळी अनेक UAN तयार करण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. अशी देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.