मोठी बातमी! नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; सत्ताधारी एनडीपीत सामील

Ajit Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी नागालँड राज्यातून आली आहे. नागालँडमधील (Nagaland NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सात आमदारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सहभागी झाले. राजकारणात खळबळ उडवून देणारी ही घडामोड शनिवारी घडली. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वातील पक्षाला आता विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे. या घडामोडीनंतर नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रोसिव्ह पार्टीच्या आमदारांची संख्या आता 32 झाली आहे. या राजकीय घडामोडीने पक्षप्रमुख अजित पवार यांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसला आहे. नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शून्यावर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नागालँडच्या सातही आमदारांना अजित पवारांना पाठिंबा दिला होता. 2023 मध्ये झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पक्षाचे 7 आमदार निवडून आले होते. परंतु, आता या सातही आमदारांनी सत्ताधारी एनडीपीपी आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagaland Election Result : नागालँडमध्येही राष्ट्रवादी पुन्हा; 2 विधानसभा मतदार संघात विजय, तर..
विधानसभेचे अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीत सहभागी होत असल्याची पत्रे सादर केली. हे विलीनीकरण भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक आवश्यकता पूर्ण करते. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार या आमदारांवर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी पक्षाला जो जनादेश दिला त्याचा हा अपमान आहे. आमदारांचं नेमकं काय म्हणणं होतं. त्यांनी हा निर्णय का घेतला याची माहिती घेण्यासाठी आमदारांशी चर्चा करणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
नागालँड विधानसभा सदस्य नियम 2019 नुसार सभापतींनी विलीनीकरणाला मान्यता दिली आणि त्यानुसार पक्ष संलग्नता नोंदी अपडेट करण्याचे निर्देश विधानसभा सचिवालयाला दिले आहेत. राज्यमंत्री केजी केन्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांना विलीनीकरणाचे पत्र दिले. अध्यक्षांनी त्यांचे पत्र स्वीकारले.
नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन