इंधन टंचाईच्या अफवांदरम्यान पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक; सर्व राज्यांचा पुरवठा आढावा घेणार

आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 101

Prime Minister’s high-level meeting : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा वेगाने पसरत आहेत. मात्र, या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचं स्प्ष्ट करण्यात आलं आहे. तरी देखील या अफवांचा परिणाम राज्यातील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. नागरिक भीतीपोटी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेड आणि परभणीसारख्या शहरांमध्ये परिस्थिती अधिक तीव्र झाली असून काही पेट्रोल पंपांवर तात्पुरत्या स्वरूपात साठा संपल्याची नोंद आहे. वाढत्या मागणीमुळे काही ठिकाणी इंधन वितरणावर मर्यादा देखील घालण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरून युद्धामुळे इंधन संपणार अशा चुकीच्या संदेशांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन साठवण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत देशातील सध्याच्या इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच भविष्यातील उपाययोजना, पुरवठा व्यवस्थापन आणि संभाव्य आव्हानांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

कर कमी झाला, पण दर नाही, इंधन धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह; ग्राहक मात्र नाराज

केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा तुटवडा नाही, सर्व पेट्रोलपंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय, काही ठिकाणी जाणीवपूर्वक अफवा पसरवून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे.

अशा प्रकारच्या खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. एकूणच, सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखत जबाबदारीने वागणं अत्यंत गरजेचं आहे.

follow us