PV Narsimha Rao : 1990 चं दशक, संकटांचाच काळ; नरसिंहराव भारतासाठी ठरले संकटमोचक

PV Narsimha Rao : 1990 चं दशक, संकटांचाच काळ; नरसिंहराव भारतासाठी ठरले संकटमोचक

PV Narsimha Rao : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना आज भारतरत्न (PV Narsimha Rao) पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत या पुरस्कारांची घोषणा केली. नरसिंहराव यांच्यासह एमएस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाला. पीव्ही नरसिंहराव 1991 ते 1996 या चार वर्षांच्या काळात देशाचे नववे पंतप्रधान होते. 28 जून 1921 रोजी तत्कालीन हैदराबाद राज्यातील (आजचे तेलंगाणा) वारंगल जिल्ह्यातील वंगारा गावात त्यांचा जन्म झाला होता. राव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दित भारतीय राजकारण आणि आर्थिक सुधारणांत मोठे योगदान दिले.

बौद्धिक आणि बहुभाषी क्षमता राव यांच्यात होत्या. त्यांना तेलुगू, हिंदी, इंग्रजी आणि द्रविड, इंडो युरोपीय भाषांसह जवळपास 18 भाषा बोलता येत होत्या. कायद्याच्या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. कमी वयातच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नोंदवला.

चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

पंतप्रधान होण्याआधी राव यांनी काँग्रेस पक्ष आणि भारत सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी 1971 ते 1973 या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. केंद्र सरकारमध्ये त्यांनी विदेश मंत्रालय, संरक्षण आणि गृहमंत्री म्हणून काम केले. पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी आर्थिक सुधारणा मोठ्या प्रमाणात केल्या. याच क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी आजही त्यांची आठवण काढली जाते.

1991 मध्ये भारताला अत्यंत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्याकाळात देशासमोर महागाई, अत्यल्प परकीय गंगाजळी, बाह्य कर्ज फेडण्यातील अक्षमता अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत होते. त्यावेळी राव यांनी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना सोबत घेत अर्थव्यवस्थेत मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. व्यापारी उदारीकरणाचे उपाय लागू केले. परकीय गुंतवणुकीसाठी अर्थव्यवस्था खुली करणे, व्यापार व्यवस्थेत व्यापक सुधारणा, देशांतर्गत बाजाराचे नियमन अशा उपाययोजना केल्या.

मोठी बातमी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर; PM मोदींनी केली घोषणा

भारताच्या विदेश धोरणातही राव यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी इस्त्रायलबरोबर राजनयिक संबंध स्थापित केले. लूक ईस्ट धोरणानुसार पूर्व आशियातील देशांबरोबरील संबंधांतही सुधारणा केली. राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त राव एक उत्तम लेखकही होते. त्यांनी कथा, राजकीय टिप्पण्या लिहिल्या. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले. काँग्रेसकडून मात्र त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका काँग्रेसवर होत असते.

आता केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. ज्यावेळी देश संकटात होता त्याकाळात नरसिंहराव यांनी देशाचे नेतृत्व केले आणि देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात आर्थिक आणि विदेशनितीत मोठे बदल झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube