Rahul Gandhi : अदानी वरच्या पुढच्या भाषणाची भीती म्हणून निलंबन; पत्रकार परिषदेमध्ये आरोप
Rahul Gandhi Press Conference : संसदेतल्या माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून पंतप्रधान मोदींनी मला अपात्र केलं. त्यांनी ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ते पुढे म्हणाले की मला माझी सदस्यता मिळाली नाही मिळाली, तरी मी माझं काम करत राहीन. मी संसदेत आहे की बाहेर याचा मला काही फरक पडत नाही.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
Rahul Gandhi Press Conference : मोदी-अदानी यांचे संबंध काय? ते २० हजार कोटी कोणाचे?
मी सावरकर नाही, माफी मागणार नाही
राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो, आम्ही सर्व एकत्र काम करू. असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी माफी मागणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले- गांधी कधीही दिलगिरी व्यक्त करीत नाहीत. मी सावरकर नाही.
हा मुद्दा ओबीसीचा नाही
राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर हा ओबीसी समाजाचा अपमान आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. त्यावर हे ओबीसीच्या अपमानाचा मुद्दा नाही तर हे अदानी आणि मोदीजी यांच्यातील संबंधांचा मुद्दा आहे. ते पुढे म्हणाले की भारत जोडो यात्रेदरम्यान दिलेली माझी विधाने आपण पाहिल्यास, मी असे कधीही असं बोललो नाही, संपूर्ण देश एकत्र येण्यासाठी मी प्रत्येक वर्गाशी बोललो.