कर्नाटकात आनंद, राजस्थानात टेन्शन; काँग्रेसच्याच नेत्याच्या ‘त्या’ यात्रेचे साईड इफेक्ट
Sachin Pilot vs Ashok Gehlot : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड यश मिळाले असून काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. या यशाच्या आनंदात असतानाच उत्तर भारतातील एका राज्यातून टेन्शन देणारी बातमी आली आहे. होय, राजस्थानमध्ये दोन काँग्रेस (Rajasthan Congress) नेत्यांच्या वादामुळे काँग्रेसला नुकसान होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी नुकतीच एक जनसंघर्ष यात्रा काढली आहे. भ्रष्टाचार आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात ही यात्रा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. अशा वेळी जेव्हा गेहलोत राज्यात पुन्हा काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे दावे करत आहेत त्याचवेळी पायलट यांच्या या यात्रेमुळे काँग्रेसला नुकसान होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेतून या गोष्टी समोर आल्या आहेत.
कर्नाटकमधील काँग्रेसचे रियल वॉरिअर, भाजपच्या प्रत्येक अजेंड्याला दिला छेद
राजस्थानात सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. त्यात येथील राजकारणाचा पाराही चढला आहे. येथे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून पक्षात गटबाजीही वाढली आहे. सचिन पायलट यांनी याआधी भाजप सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी होत नाही म्हणून आपल्याच सरकारवर निशाणा साधला होता. इतकेच नाही तर त्यांनी सरकारविरोधात एक दिवसाचे आंदोलनही केले होते. त्यानंतर पायलट पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
यावेळी पायलट यांनी अजमेर ते जयपूर अशी पायी यात्रा काढली आहे. एबीपी, सी-वोटरने संयुक्तपणे या यात्रेचा काँग्रेसवर काय परिणाम होईल याचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून जे निष्कर्ष समोर आले आहेत ते काँग्रेसची काळजी वाढविणारे आहेत.
या सर्व्हेनुसार, या यात्रेमुळे काँग्रेसला नुकसान होईल का असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. त्यावेळी 42 टक्के लोकांनी या यात्रेमुळे काँग्रेसला मोठे नुकसान होईल असे म्हटले. तर 18 टक्के लोकांना काँग्रेसचे फार नुकसान होईल असे वाटत नाही. तसेच 29 टक्के लोकांनी असे सांगितले की पायलट यांच्या या यात्रेमुळे काँग्रेसला कोणतेही नुकसान होणार नाही. एक टक्के लोकांनी माहिती नाही असे उत्तर दिले.
या सर्व्हेत 1 हजार 374 लोकांची मते विचारात घेण्यात आली. राजस्थानात या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा वेळी पायलट यांनी काढलेल्या या यात्रेमुळे काँग्रेसला नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. या यात्रेचा खरेच जर फटका बसला तर त्याचा फायदा भाजपला (BJP) होणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.