प्रसिद्ध IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा; 13 वर्षांचा प्रवास आठवणींतून उलगडला
सामान्य परिस्थितीतून पुढे येत दिव्या मित्तल यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली.
प्रख्यात आयएएस अधिकारी दिव्या मित्तल (IAS) यांनी तब्बल 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. X वरील पोस्टद्वारे त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती देताना सेवाकाळातील अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. 13 वर्षांचा हा प्रवास आपल्यासाठी अविस्मरणीय राहिल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.
सामान्य परिस्थितीतून पुढे येत दिव्या मित्तल यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. IIT दिल्ली आणि IIM बंगळूर येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र, परदेशातील यशस्वी करिअर असूनही मायदेशापासून दूर राहणं त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यामुळं त्यांनी लंडनमधील नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या विकासात प्रत्यक्ष योगदान देण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. याच भावनेतून त्यांनी नागरी सेवेत प्रवेश केला आणि IAS अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. देवरिया आणि मिर्झापूर येथे प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना समाजातील विविध घटकांसोबत काम करता आलं. गरजू कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जवळून समजून घेण्याची संधी या काळात मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.
प्रशासकीय सेवेत काम करताना सरकारी कागदपत्रांच्या मागं प्रत्यक्ष माणसाचं आयुष्य असतं, याची जाणीव झाल्याचं मित्तल यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सुरुवातीला आपण लोकांसाठी काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी आलो आहोत, असं वाटत होतं. मात्र, हा विचार काहीसा भोळेपणाचा होता, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी नागरिकांकडून मिळालेले प्रेम आणि आदर हे आपल्या सेवाकाळातील सर्वात मोठे समाधान ठरल्याचं त्यांनी नमूद केलं.
सेवेत असताना आलेल्या तणावाच्या आणि थकव्याच्या प्रसंगांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा वेळी लोकांनी दाखवलेला विश्वास आणि सहकाऱ्यांकडून मिळालेली साथ यामुळं पुढं जाण्याचं बळ मिळालं, असं त्यांनी सांगितलं. आपल्या कारकिर्दीत सोबत काम केलेले अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. भारत घडवण्याच्या प्रक्रियेत आपल्या योगदानाचा ठसा उमटवण्याची इच्छा होती, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
राजीनाम्याच्या घोषणेसोबत दिव्या मित्तल यांनी एका वृद्ध महिलेची आठवण सांगितली. गावात पहिल्यांदा पाणी पोहोचवल्यानंतर त्या महिलेने कोणतेही शब्द न उच्चारता त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. आयएएस पद आता मागं राहिलं असलं तरी त्या महिलेचा आशीर्वाद आणि देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न कायम आपल्या सोबत राहील, अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली आहे.