…म्हणून राजस्थानच्या कोटामध्ये हॉस्टेल्सच्या सीलिंग फॅनला सेफ्टी जाळी अन् अँटी-सुसाइड डिव्हाइस
Kota, Rajasthan कोट्यातील अनेक हॉस्टेल्समध्ये छताच्या पंख्याभोवती लोखंडी जाळं बसवण्यात आलं आहे.
Safety net on ceiling fan of hostel in Kota, Rajasthan : देशभरात ‘स्वप्नांचं शहर’ म्हणून ओळखला जाणार कोटा शहर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. लाखो विद्यार्थी इथे येतात. कोणी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन, तर कोणी इंजिनिअर होण्याच्या ध्यासाने. NEET आणि JEE सारख्या कठीण परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या या मुलांचं जग इथेच उभं राहतं. पण आता याच शहरातून काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसतंय की, कोट्यातील अनेक हॉस्टेल्समध्ये छताच्या पंख्याभोवती लोखंडी जाळं बसवण्यात आलं आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसलाय कारण या जाळ्या बसवण्या मागचा उद्देश्य अत्यंत धक्कादायक आहे.
सीलिंग फॅनला सेफ्टी जाळी अन् अँटी-सुसाइड डिव्हाइस
कोट्यातील अनेक हॉस्टेल्समध्ये छताच्या पंख्याभोवती लोखंडी जाळं बसवण्यात आलं आहे. या मागचं कारण मात्र खूप गंभीर आणि वेदनादायक आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा वाढता ताण आणि मानसिक तणाव ही मोठी समस्या बनली आहे. प्रचंड स्पर्धा, घरच्यांच्या अपेक्षा, स्वतःचं स्वप्न या सगळ्याच्या ओझ्याखाली काही विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हॉस्टेल मालक आणि प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय अवलंबला आहे. पंख्यांवर लोखंडी जाळं बसवणं म्हणजे कुणीही क्षणिक तणावात टोकाचं पाऊल उचलू नये, हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
आत्महत्याविरोधी उपाय
दरम्यान कोटामध्ये लाखो विद्यार्थी विविध कोचिंग सेंटरमध्ये नीटची तयारी करत असतात. त्यात 3 मे 2026 रोजी NEET परीक्षा पार पडली. या काळात विद्यार्थ्यांवरचा ताण आणखी वाढतो. त्यामुळे खबरदारी म्हणून केवळ पंखेच नाही, तर उंच इमारतींच्या खिडक्या आणि बाल्कनींनाही सुरक्षा जाळी लावली जात आहे. काही ठिकाणी विशेष अँटी-सुसाइड डिव्हाइस (anti-suicide devices) देखील बसवले जात आहेत.
फक्त जाळं पुरेसं आहे का?
कोटा हे केवळ एक शहर नाही ते हजारो स्वप्नांचं ओझं वाहणारं ठिकाण आहे. पण प्रश्न असा आहे की, फक्त अशा सुरक्षात्मक उपायांनी समस्या सुटेल का? तज्ञांच्या मते, याचं उत्तर “नाही” असंच आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं, त्यांना भावनिक आधार देणं आणि अपयशालाही स्वीकारण्याची शिकवण देणं तितकंच गरजेचं आहे.
मतदारांनी काँग्रेसचे हिंदू उमेदवारही नाकारले; आसाम, केरळ अन् बंगालच्या निकालांनी उडवली झोप!
या विषयावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. काही लोक म्हणतात—हे पाऊल आवश्यक आहे, तर काहींचं मत आहे की, ही फक्त तात्पुरती उपाययोजना आहे. खरी गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या मनाला समजून घेण्याची. शेवटी एकच प्रश्न उरतो कोटा खरंच ‘स्वप्नांचं शहर’ राहिलंय का, की आता ते ताण आणि दबावाचं प्रतीक बनत चाललंय?