राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पॅलेट गन प्रकरणात अखेर FIR, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

News Photo   2026 08 21T194758.316

जंतरमंतर परिसरातील आंदोलनादरम्यान (Delhi) पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या वादाला शुक्रवारी नवे वळण मिळाले. पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या साहिल लोहबच याच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल सात ते आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली.

एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ही कारवाई न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचं म्हटलं. ही तर फक्त सुरुवात आहे, न्यायाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एका तरुणावर अन्याय झाला असून त्याच्यासाठी तक्रार दाखल करण्यासच इतका वेळ लागणं ही गंभीर बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

पॅलेट गन पीडितासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात; FIR दाखल करण्याच्या मागणीवर ठाम

राहुल गांधी यांनी पोलिसांवर थेट दबावाचा आरोप केला. पोलीस अधिकारी तक्रार नोंदवण्यास तयार होते. मात्र, त्यांना वरून रोखण्यात येत होतं, असा दावा त्यांनी केला. एफआयआर दाखल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मंजुरी घ्यावी लागली, असा आरोप करत त्यांनी या प्रकरणात नेमका दबाव कुणाचा होता, असा सवाल उपस्थित केला.

साहिल लोहबच हा 20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान कनॉट पॅलेस परिसरात उपस्थित होता. आंदोलनावेळी पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप त्याने केला असून त्याच्या शरीरात छर्रे घुसल्याचं सांगण्यात आलं आहे. याच प्रकरणी न्याय मिळावा आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी राहुल गांधी यांच्यासोबत साहिल आणि त्याचे आई-वडीलही पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसले होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘दिल्लीत न्याय मिळवण्यासाठी एका नागरिकाला आठ तास संघर्ष करावा लागत असेल, तर देशातील छोट्या शहरांमधील आणि गावांमधील पोलीस ठाण्यांची परिस्थिती काय असेल? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून साहिलला न्याय मिळवून देण्याची मागणी आता काँग्रेसकडून जोर धरू लागली आहे.

follow us